ठाणे - डम्पर चालक असलेल्या नोकराने दुसऱ्या चालकासोबत झालेले भांडण सोडवण्यासाठी मालकाने मध्यस्थी न केल्याच्या रागातून एका नोकराने मालकाच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना अंबरनाथ शहरातील फॉरेस्टनाका परिसरात घडली आहे. याप्रकरणी नोकराविरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास साठे (५५) असे पेट्रोलच्या आगीत गंभीर जखमी झालेल्या मालकाचे नाव आहे. रमेश उर्फ मिलन कोरी असे मालकाला जिवंत जळणाऱ्या नोकराचे नाव असून या दोघांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.
अंबरनाथ शहरातील फॉरेस्टनाका परिसरात विलास साठे यांचे कार्यालय आहे. त्यांच्याकडे डम्पर चालक म्हणून आरोपी रमेश उर्फ मिलन कोरी हा कामाला आहे. तसेच मालक विलास यांच्याकडे अजून एक रेड्डी नावाचा व्यक्ती चालक म्हणून काम करतो. दोन-तीन दिवसांपूर्वी आरोपी रमेश याचे रेड्डीसोबत भांडण झाले होते. त्यावेळी ते भांडण मालक विलास यांनी सोडवावे असे रमेशचे म्हणणे होते. मात्र, मालक विलास हे त्यांच्या भांडणात पडले नाहीत. त्याचा राग नोकर रमेशला आला होता. मालक विलास यांनी भांडण न सोडवल्याने त्या गोष्टीचा राग मनात धरून सायंकाळच्या सुमारास हातात पेट्रोलची भरलेली बाटली घेऊन आरोपी रमेश हा मालक विलास यांच्या कार्यालयात शिरला. त्यावेळी विलास हे कार्यालयात काम करत असताना रमेशने पेट्रोलने भरलेली बाटली विलास यांच्या अंगावर ओतून त्यांना आग लावून पेटवून दिले. त्यावेळी रमेश याच्या अंगावरदेखील पेट्रोल उडाल्याने त्या आगीच्या लपाट्यात तो ही सापडला. मालक विलास हे ५५ टक्के भाजले असून आरोपी रमेशदेखील ३० टक्के आगीत होरपळला आहे.
गंभीर जखमी अवस्थेत मालक विलास यांना उपचारासाठी नवी मुंबई येथील ऐरोली परिसरातील बर्न हॉस्पिटलमध्ये तर आरोपी रमेश याला कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी विलास साठे यांनी दिलेल्या तक्रारीवरून रमेश उर्फ मिलन कोरीविरुद्ध अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.