ठाणे - गोदाम मालकाने नोकराला २ कोटी रुपयांचा एलईडीचा माल दुसऱ्या गोदामात हलवण्यासाठी सांगितले. मात्र, या नोकराने मालकाचा विश्वासघात करुन तो माल परस्पर लंपास केल्याची घटना घडली. ही घटना भिवंडी तालुक्यातील पूर्णा ग्रामपंचायत हद्दीतील चौधरी कंपाऊंडमधील एका गोदामात घडली. याप्रकरणी गोदाम मालक सुरजित लाल सिंग यांच्या तक्रारीवरून नोकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपेश पटेल असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपी नोकराचे नाव आहे.
हेही वाचा... अमूलची सोशल मीडियावरून बदनामी; आरोपीने 'ही' मागणी करताच गुन्हा दाखल
भिवंडी तालुक्याच्या गोदाम भागातील पूर्णा ग्रामपंचायत हद्दीतील चौधरी कंपाऊंडमधील रॉयल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशनचे गोदामात अवकाळी पावसामुळे पाणी शिरले होते. त्यामुळे तेथील मालाचे नुकसान टाळण्यासाठी गोदामाचे मालक सुरजित लाल सिंग यांनी गोदामातील नोकर दीपेश पटेल याला पद्मिनी कॉम्प्लेक्स येथील दुसऱ्या गोदामात माल हलवण्यास सांगितले होते. हीच संधी साधून त्या मालामध्ये हेराफेरी करून नोकराने सुमारे २ कोटी ९ लाख ८३ हजार ५० रुपये किमतीच्या एलईडीचा माल लंपास केला आहे. त्यामुळे गोदाम मालक सुरजित लाल सिंग यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केली आहे.
हेही वाचा... मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत अपशब्द, महिला शिवसैनिकांनी अधिकाऱ्यावर ओतली शाई
चोरीची घटना निदर्शनास आल्याने सुरजित लाल सिंग यांनी नारपोली पोलीस ठाण्यात नोकर दीपेश पटेल याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.