ठाणे - 'ऑनलाइन शिक्षण म्हणजे काय रे भाऊ?' असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी 'शाळा बंद पण शिक्षण सुरू' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील आदिवासी वाड्या-वस्त्यांवर नवसंजीवन सामाजिक संस्थाच्या वतीने शिक्षकांच्या पथकामार्फत आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्यात येत आहेत. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणे हा या उपक्रमाचा मूळ उद्देश आहे. या स्तुत्य उपक्रमाबाबत ग्रामीण भागातील पालकांनी समाधान व्यक्त केले.
राज्यभर कोरोनासंसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य उद्योगधंद्यांसोबत शिक्षण व्यवस्थेवरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्र अनलॉकच्या माध्यमातून इतर छोटे मोठे व्यवसाय, उद्योगधंदे उभारी घेत आहे तरीही राज्याचं ग्रामीण भागातील शिक्षण थांबल्याचे चित्र आहे. राज्य शिक्षण विभागाने संपूर्ण राज्यभर ऑनलाईन शिक्षण प्रणाली जरी सुरू केली असली, तरी आजही ग्रामीण भाग, आदिवासी वस्ती वाड्यामध्ये ऑनलाइन म्हणजे काय? याची साधी संकल्पनाही मुलांपर्यंत पोहोचली नाही. अशा वेळेस नवसंजीवन शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेने शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित असलेल्या घटकाला शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी 'शाळा बंद, पण शिक्षण सुरू' असा एक अनोखा उपक्रम हाती घेतलेला आहे.
या उपक्रमात शहापूर तालुक्यातील विविध भागांमधील शिक्षक व पदवीधर युवक-युवती या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. 'शाळा बंद, पण शिक्षण चालू' हा उपक्रम 1 ऑगस्टपासून तालुक्यातील साकडबाव ग्रामपंचायत हद्दीतील 'बाबरवाडी' या आदिवासी वस्तीतून करण्यात आला. संपूर्ण शहापूर तालुक्यासाठी शिक्षकांच्या 14 टीम तयार केलेल्या आहेत. शाळा सुरू होईपर्यंत, विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक नरेश पडवळ यांनी दिली.
ग्रामपंचायतमधील सरपंच, पोलीस पाटील यांच्या सहमतीने आणि शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करुन हा उपक्रम सुरू आहे. शिक्षकांच्या पथकाचे नेतृत्व शिक्षक निलेश डोहळे, सोमनाथ रसाळ, अश्विनी पडवळ, जयश्री खंडवी, प्रमोद डोहळे, रमेश हरणे यांच्याकडे आहे.