ठाणे: वाढती महागाई आणि पेट्रोल डिझलच्या किंमती यामुळे नागरिक मेटाकु़टीला आले आहे. आता शालेय बस वाहतूक दरही वाढणार आहे. त्यामुळे आधीच महागाईमुळे हवालदिल झालेल्या पालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. महागाईमुळे एकीकडे दरवर्षी वाढणारी शालेय फी, त्यात आता एमएमआरडीए क्षेत्रात सर्वच खासगी शाळांमधील बस वाहतुकीच्या दरात 30 टक्के दरवाढ प्रस्तावित केली आहे. यात अनेक मोठ्या शहरांचा समावेश आहे. त्यामुळे दरवाढीचा फटका लाखो पालकांना बसणार आहे. या दरवाढीला पालकांचा विरोध होत आहे. त्यामुळे एकीकडे अडचणीत आलेला वाहतूक दर आणि पालक यांच्या संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
शिक्षण घेणे परवडणार नाही: बस ओनर्स सेवा संघ या संघटनेने येणाऱ्या शैक्षणिक वर्षांमध्ये बस सेवा देण्यासाठी 30 टक्के दरवाढ प्रस्तावित केली आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती, देखभालीचा खर्च, वाढलेल्या वाहनांच्या किंमती आणि व्याजदर या सर्वांचा परिणाम म्हणून दरवाढ करण्याशिवाय आम्हाला पर्याय नसल्याचे वाहतूकदार सांगत आहेत. दुसरीकडे पालकांनी शालेय फीज, शैक्षणिक साहित्य, महागाई या सर्वच गोष्टी महागल्या आहेत. आता बस दरामध्ये दरवाढ केल्यास शिक्षण घेणे देखील परवडणार नसल्याचे पालक म्हणतात. या सर्वांवरती राज्य सरकारचे निर्बंध नसल्यामुळे काही वाहतूकदार पालकांची पिळवणूक करत असल्याचे आरोप पालकांनी केले आहेत.
परिवहन विभागाचे निर्बंध असावेत: वाहतूक करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसेस रिक्षा आणि इतर वाहनांवर फिटनेस बाबत परिवहन विभागाचे निर्बंध आहेत. मात्र त्यांच्या दराबाबत कोणतेही निर्बंध नसल्याचे पालकांनी सांगितले. या वाहतूकदारांच्या मनमानी कारभारावर परिवहन विभागाने नियंत्रण ठेवावे अशी मागणी देखील पालक करत आहेत. सुट्टीच्या काळातील वाहतुकीचा न झालेल्या खर्च देखील वाहतूकदार पालकांकडून वसूल करत असल्याचा आरोप, यावेळी पालकांनी केला आहे. म्हणूनच यासाठी परिवहन विभागाने कठोर नियमावली असावी अशी विनंती पालक करत आहेत.
हेही वाचा: RTE Admission यंदाही लाखो विद्यार्थी शिक्षण हक्कापासून राहणार वंचित उपलब्ध जागांपेक्षा दुपटीहून जास्त आले अर्ज