ठाणे - भिवंडी शहर महानगरपालिका क्षेत्रात गेल्या दोन महिन्यांपासून अस्वच्छतेचे प्रमाण वाढले असून त्यामध्ये मलेरिया, टॉयफाईड आदींसह डेंग्यू यांसारख्या जीवघेण्या आजाराने थैमान घातले आहे. दोन महिन्यात सहा जणांचे बळी गेले असून गुरुवारी सायंकाळी शहरातील देवजीनगर, नारपोली येथील आदेश्वर टॉवरमध्ये राहणाऱ्या सात वर्षीय शाळकरी मुलाचा डेंग्यूच्या तापाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
हेही वाचा - शिवसेना 'घालीन लोटांगण' करीत सत्तेत सहभागी होणार - नरेंद्र वाबळे
युवम निंकुज शहा (वय ७) असे डेंग्यूच्या आजाराने बळी गेलेल्या मुलाचे नाव आहे. युवम दुसरीच्या वर्गात शिकत होता. त्याला सकाळी ताप आला होता. त्यामुळे पालकांनी त्याला उपचारासाठी शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र दिवाळी सणात डॉक्टर सुट्टीवर असल्याने त्याच्यावर वेळीच उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे युवमची प्रकृती अधिकच खालावल्याने त्याला तात्काळ ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतानाच युवमची प्राणज्योत मालवली.
भिवंडी महापालिका क्षेत्रात गेल्या दोन महिन्यांत ८० डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी सहा जणांचे बळी गेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी व ठेकेदारांनी शहरातील कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले असून गटार, नाले तुंबल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. पालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाचे पुर्णतः दुर्लक्ष झाल्याने शहरात साथीचे रोग फैलावत असल्याने पालिका प्रशासनाच्या विरोधात नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून डेंग्यूच्या वाढत्या प्रकोपाने भिवंडी शहर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.