ठाणे : २८ वर्षीय तरुणाला नशेबाज मित्रांची संगत लाभल्याने तो अमली पदार्थाच्या विविध नशेच्या आहारी गेला. दुसरीकडे नशेचा व्यापारही महागल्याने त्याला नशेचे व्यसन करण्यासाठी पैसे कमी पडू लागले. यामुळेच चोरीचा मार्ग निवडणाऱ्या अट्टल चोरट्याला कोनगाव पोलीस पथकाने सापळा रचून बेड्या ठोकल्या आहे. सरफराज अजमल खान (वय २८,रा. विठ्ठलनगर भिवंडी ) असे अटक चोरट्याचे नाव आहे.
कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा : चोरटा सरफराज हा भिवंडी शहरातील नारपोली भागातील विठ्ठलनगरमध्ये राहत असून त्याचा भंगार विक्रीचा व्यवसाय आहे. नशेबाज मित्रांसोबत राहून त्याला अमली पदार्थाचे व्यसन लागले होते. पण व्यसन महाग झाल्याने त्याला पैसे कमी पडू लागल्याने त्याने चोरीचा मार्ग निवडल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्यातच २८ जानेवारी रोजी रांजणोली येथील मुंबई, नाशिक मार्गावरील बायपासच्या ब्रिजखालून एका इसमाच्या हातातून १५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने पळून नेला होता. त्यानंतर तक्रारदारांनी ३० जानेवारी रोजी मोबाईल पळविणाऱ्या अज्ञात चोरट्याविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता.
चोरट्याला अटक : त्याअनुषंगाने कोनगाव पोलीस ठाण्याचे वपोनि राजेंद्र पवार यांनी गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ३१ जानेवारी रोजी सपोनि अभिजीत पाटील, पोह अरविंद गोरले, अमोल गोरे, मधुकर घोडसरे, पोना गणेश चोरगे, नरेंद्र पाटील, पोशि हेमंत खडसरे, हेमराज पाटील या पोलीस पथकाने सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक तपास करून चोरट्याला भिवंडीतून शिताफीने अटक केली आहे.
५ लाखांचा मुद्देमाल जप्त : अटक चोरट्याकडे कसून चौकशी केली असता त्याने ४ गुन्ह्यांत जबरी मोबाईलची चोरी तसेच वाहनांची चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून ५५ हजारांच्या दोन मोटारसायकल, ५ लाख रुपयांचा एक टाटा एस टेम्पो, तसेच २८ हजार रुपये किमतीचे ३ मोबाईल असा एकूण ५ लाख ८३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आज चोरट्याला न्यायालयात हजर केले असता १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनवाल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील यांनी दिली आहे.