ठाणे - नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत असणाऱ्या कामोठे पोलीस ठाण्यात कोरोना विषाणू निर्जंतुकीकरण कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी या कक्षाचा फार मोठा उपयोग होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस ठाण्यात येणारे सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांना या कक्षामधून प्रवेश दिला जाईल. यात त्यांचे सॅनिटायझर लिक्विडने फवारणी करून निर्जंतुकीकरण केले जाणार आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात संवेदनशील वातावरण आहे. पोलिसांना 24 तास कर्तव्यावर हजर राहावे लागत असल्याने यंत्रणेवर ताण येत आहे. अशातच पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचा धोका संभावतो. पोलिसांना कामाकरिता ठाण्यात सतत येणे-जाणे करावे लागत असते. यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाांतर्गत असणाऱ्या कामोठे पोलीस ठाण्यात कोरोना विषाणू निर्जंतुकीकरण कक्षाची उभारणी करण्यात आली आहे.
हे निर्जंतुकीकरण कक्ष फारच लाभदायी ठरू शकते, तसेच याचा सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. या कक्षाचे उद्घाटन नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्या माध्यमातून करण्यात आले..