ठाणे - सध्या कोरोना महामारीमुळे खबरदारी बाळगण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. त्यासाठीच ठाण्यातील काही तरुणांनी सॅनिटायझर बँड्स बनवले आहेत. हे बँड हातात घातल्यानंतर सॅनिटायझरची बाटली सोबत बाळगण्याची गरज भासणार नाही. सध्या या बँड्सचे पोलीस बांधवांना वाटप करण्यात आले. तसेच येत्या रक्षाबंधन आणि फ्रेंडशीप डे या दोन्ही दिवशी एकमेकांना भेट देण्यासाठी हे बँड्स उपयागी ठरणार आहे.
देशात गेल्या ३ महिन्यापासून कोरोनाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नाक, डोळ, तोंडाला हात लावू नये. हात वारंवार साबण किंवा सॅनिटाझरने निर्जंतुकीकरण करा, अशी खबरादारी बाळगण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. त्यासाठी बाजारात सॅनिटाझर उपलब्ध आहेत. मात्र, बाहेर जाताना कधी-कधी सॅनिटायझरची बाटली सोबत ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळे ठाण्यातील धनंजय गरुड, शैलेश कदम आणि त्यांच्या मित्रांना नवीन सॅनिटायझर बँड बनविण्याची कल्पना सूचली. त्यानुसार त्यांनी हे सॅनिटायझर बँड्स तयार केले आहे.
कसे आहे सॅनिटायझर बँड -
हा बँड ट्युबसारखा आहे. तो तुम्ही सहजपण हातात घालू शकता. तसेच ट्युब प्रेस करून आवश्यक तेवढे सॅनिटाझर हातावर घेऊन हाताचे निर्जंतुकीकरण करू शकता. विशेष म्हणजे याचे मटेरियल तापमान ७० ते २५० डिग्री सेल्सिअस आहे. सॅनिटायझर संपल्यानंतर ही ट्युब परत अगदी सोप्या पद्धतीने भरता देखील येते. तसेच लहानापासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंत हे बँड्स कोणीही वापरू शकतात. तसेच बाजारात अगदी कमी किंमतीत हे बँड्स उपलब्ध आहेत. दरम्यान, या बँड्सचे पोलिसांना वाटप करण्यात आले असून पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले यांनी या तरुणांचे कौतुक केले.