ठाणे - कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे उल्हासनगर शहरातील मध्यवर्ती पोलीस ठाण्यात निर्जंतुकीकरण पॉईंट पोलीस ठाण्याच्या मुख्यप्रवेश दारावर उभारण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असताना सुरक्षा कर्मचाऱ्यांना कोरोनाचे संक्रमण होऊ नये, यासाठी पोलीस ठाण्याच्या मुख्य प्रवेश दारावर निर्जंतुकीकरण पॉईंट उभारण्यात आला आहे.
पॉईंटमध्ये शिरताच शरीरावर निर्जंतुकीकरण द्रव्याची फवारणी होते. त्यामुळे, शरीर निर्जंतुक होते आणि त्यातून पोलिसांना कोरोना विषाणूपासून सुरक्षा मिळते. तसेच पोलीस ठाण्यात आलेल्या तक्र्रादाराला पोलीस ठाण्याच्या आत निर्जंतुकीकरण पॉईंट मधून यावे लागणार असल्याची माहिती साहायक पोलीस आयुक्त डी. डी. टेळे यांनी दिली आहे. तर उल्हासनगर शहरात ठिकठिकाणी पोलीस दल, एसआरपीएफ, होमगार्ड यांचा मोठ्या प्रमाणात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शहरातील इतर ठिकाणी देखील पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, येत्या काही दिवसात असे निर्जंतुकीकरण पॉईंट ठीकठिकाणी उभारण्यात येणार आहे.
दरम्यान, उल्हासनगर शहरात यापूर्वी एकच रुग्ण आढळून आला होता. मात्र, त्या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, शनिवारीच शिवनेरी या खासगी रुग्णालयात दिवा परिसरात राहणार एक रुग्ण उपचासासाठी आला असता, तो कोरोना बाधित आढळून आला आहे. त्यामुळे हे खाजगी रुग्णालय सील करण्यात आले. तर येथील डॉक्टरांना व कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.