ठाणे - चिमणी दिनाचे औचित्य साधून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तर्फे मानपाडा येथील वनविभागाच्या हद्दीत संकल्प इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. २० मार्च हा जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो.
आजच्या सिमेंट काँक्रिटच्या जंगलात चिमण्यांना राहायला जागा नाही. त्यांना घरटी बांधता येत नाही. त्यामुळे त्यांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. उन्हाळ्यातही चिमण्यांना खूप त्रास होतो. या पर्यावरणाच्या र्हासाबरोबर चिमणीची प्रजातीच नष्ट होण्याची वेळ येणार की काय अशी शंका वाटते. यामुळेच चिमण्यांना वाचवण्यासाठी २ वर्षापूर्वी चिमणी बचाव मोहिमेची सुरुवात ठाण्यातील संकल्प इंग्लीश स्कूलच्या वतीने करण्यात आली.
चिमणी दिनाचे औचित्त्य साधून सन २०१७ या वर्षी चिमण्यांसाठी हजारो घरटी विद्यार्थ्यांमार्फत बनवून ठाणे शहरात वाटप करण्यात आली होती. सन २०१८ या वर्षी 'चिमणी' हा काव्यसंग्रह प्रकाशित करून आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. याची दखल 'D.B. Of Record (USA) यांनी घेतली असून त्याचे प्रमाणपत्र लवकरच संस्थेला मिळणार आहे. गत वर्षीप्रमाणे यंदाही चिमणी दिनाचे औचित्य साधून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तर्फे मानपाडा येथील वनविभागाच्या हद्दीत संकल्प इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती केली.
आज मानपाडा येथील निसर्ग परिचय केंद्र, टिकूजीनी वाडीजवळील जंगलात अनेक घरटी लावण्यात आली आहेत. अशाप्रकारे लहान मुलांना कार्यक्रमात सहभागी करून घेतल्याने मुक्या प्राणी आणि पक्षांबद्दल जागरूकता वाढत असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.