मीरा भाईंदर(ठाणे)- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शासनाने मीरा-भाईंदर आणि वसई-विरारसाठी नव्या पोलीस आयुक्तालयाची घोषणा केली होती. त्यानंतर बरोबर एक वर्षानंतर या ठिकाणी पहिले पोलीस आयुक्त म्हणून सदानंद दाते यांची नेमणूक शासनाने केल्याची घोषणा शनिवारी केली. मात्र, पोलीस मुख्यालयाचे काय? हा प्रश्न मात्र अधांतरीतच राहिला आहे. आयुक्तालयाची घोषणा होऊन वर्ष झाले, तरी अद्यापही कार्यालयाचा पत्ता नाही. त्यामुळे पोलीस आयुक्त दाते आता त्यांचा कारभार कुठून चालवणार असा प्रश्न नागरिकांमधून चर्चिला जात आहे.
वसई विरार आणि मीरा भाईंदरची वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारी पाहता याठिकाणी नवे आयुक्तालय निर्माण व्हावे या साठी अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांत निवडणुकीच्या तोंडावर यश आले आणि तत्कालीन सरकारने वसई विरार आणि मीरा भाईंदरसाठी नव्या पोलीस आयुक्तालयाची घोषणाही केली. हे पोलीस आयुक्तालय 1 जानेवारी 2020 ला सुरू होणार होते. परंतु आयुक्तालय नक्की कुठे होणार? नवे आयुक्त कोण? असतील याबाबत शासनाने निर्णय घेतला नव्हता, त्यामुळे हा प्रश्न रखडला होता.
शासनाने 13 सप्टेंबर 2019 ला आयुक्तालयाची घोषणा केल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांनी मुख्यालय मीरा भाईंदर मध्ये करण्याची घोषणा निवडणुकीच्या तोंडावर केली होती. तर आमदार प्रताप सरनाईक यांनी याचा पाठपुरावा करत मुख्यालय मीरा भाईंदर मध्येच करण्याला शासनाकडून हिरवा झेंडा मिळवल्याने मुख्यालय भाईंदर मध्येच होणार यावर शिक्का मोर्तब झाले. त्यासाठी मीरा एमआयडीसी मध्ये जागाही आरक्षित करण्यात आली आहे. मात्र, ती जागा विकसित करण्यास जवळपास २/४ वर्ष लागणार आहे. त्यामुळे तोपर्यंत पोलीस आयुक्त आपला कारभार कुठून चालवणार? हा प्रश्न मात्र तसाच राहिला आहे. हे कार्यालय सुरू झाल्यास याठिकाणी २४८८ नवीन पदाची निर्मिती होणार असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात यश येणार आहे. यात ३ उपायुक्तांचाही समावेश आहे.
वसई विरार आणि मीरा भाईंदर या नव्या पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 21 पोलीस ठाणी-
नव्याने स्थापन होणाऱ्या आयुक्तालयाच्या हद्दीत वसई विरार मधून वसई,विरार,नालासोपारा, माणिकपूर, वाळिव , अर्नाळा, तुळींज, अशी मिळून 13 पोलीस ठाणी आहेत तर मीरा भाईंदर मध्ये सहा पोलीस ठाणी आहेत त्यात मीरा रोड , काशी मीरा ,नया नगर , नवघर,भाईंदर,आणि उत्तन याचा समावेश आहे. या आयुक्तालयाच्या हद्दीत नव्याने पेल्हार,आचोळे,मांडवी,बोळींज,नायगाव,काशिगाव आणि खारीगाव या नव्या पोलीस ठाण्याचा समावेश असणार आहे.