ठाणे - मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओतील धमकीचे पत्र आपणच ठेवल्याची कबुली निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी दिली आहे. त्या मोटारीचे मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी गुन्हे शाखेचे अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. वाझेंना 25 मार्चपर्यंत एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) कोठडी देण्यात आली होती. आज (दि.25 मार्च) त्यांची कोठडी संपत आहे. त्यापूर्वी त्यांनी धमकीचे पत्र आपणच ठेवल्याची कबुली दिली आहे. तर महत्वाचे म्हणजे या पत्राची प्रिटिंग कॉपी विनायक शिंदे यांच्या घरातील प्रिंटरमधून काढली होती. तोच प्रिंटर तीन दिवसांपूर्वी दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) अधिकाऱ्यांनी शिंदे यांच्या घरातून जप्त केला आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर 25 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली मोटार आढळली होती. या गाडीमध्ये जिलेटीनच्या कांड्या, वाहनांच्या काही बनावट नंबर प्लेट आणि एक धमकीचे पत्र मिळाले होते. अँटिलिया प्रकरणाचा तपास करताना मोटारीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. ठाण्याजवळील मुंब्रा खाडीत हिरेन यांचा मृतदेह सापडला होता. तपास अधिकारी सचिन वाझे आणि हिरेन एकमेकांना ओळखत असल्याची माहिती तपसात समोर आली. त्यानंतर वाझेंना गुन्हे शाखेतून हटवले गेले. दरम्यान, अँटिलिया प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने तपासाची सुत्रे आपल्या हातात घेतली. त्यांनी वाझेंना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने वाझेंना 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडी दिली. दरम्यान, मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा छडा लावल्याचा दावा हशतवाद विरोधी पथकाने केला. मनसुख हिरेन यांची हत्या केल्याप्रकरणी नरेश रमणीकलाल गोर (वय 31 वर्षे) आणि विनायक बाळासाहेब शिंदे (वय 51 वर्षे) या दोघांना एटीएसने अटक केली. अटक केलेला आरोपी नरेश गोर हा मुंबईत बुकी म्हणून बेकायदेशीर धंदा करत होता. त्यानेच सचिन वाझेंना सिमकार्ड पुरवले आहेत. दुसरा आरोपी विनायक शिंदे हा पोलीस दलातील बडतर्फ कर्मचारी आहे. लखन भैया बनावट चकमकीप्रकरणी शिंदे आरोपी होता.
हत्या झाली कशी
ठाण्यात मनसुख हिरेन या हत्येनंतर खऱ्या अर्थाने या प्रकरणाचा गौप्यस्फोट झाला आहे. या प्रकरणात मनसुख यांनी पोलिसांना दिलेल्या जवाबातही विसंगती आहे. काही माहिती लपवली आहे, ही माहिती भीतीमुळेच लपवली गेली होती. मनसुख यांचा भाऊ विनोद यांनी या लपवलेल्या माहितीबाबत जवाब नोंदविला आहे. त्यानुसार याप्ररणात तू स्वतःची अटक करुन घे मी तुला लवकर बाहेर काढतो, असे वाझेंनी मनसुखला सांगितले होते. याला मनसुख यांनी विरोध केला होता आणि याबाबत माहिती भाऊ विनोद यांना सांगितली होती. तेव्हा आपल्याला यात पडायचे नाही, असे विनोदने मनसुखला उत्तर दिले होते, असा उल्लेख जबाबात करण्यात आला आहे.
मनसुख यांच्यावर 'क्लोरोफॉर्मचा' प्रयोग
मनसुख यांची हत्या करण्यापूर्वी त्यांना मारहाण करुन क्लोरोफॉर्म लावण्यात आले होते. बेशुद्धावस्थेत त्यांना खाडित टाकण्यात आले होते, असा जवाब सचिन वाझे यांनी दिला आहे.
हेही वाचा - भिवंडीत पुन्हा अग्नितांडव, एकाच ठिकाणी दोन कंपन्यांना भीषण आग