ठाणे : कल्याण नगर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या माळशेज घाट पावसाळ्यात हिरवागार दिसतो. दुर्मिळ फुलझाडे, परदेशी पक्ष्यांचे आश्रयस्थान पाण्याचे उंचावरून पडणारे धबधबे, यामुळे माळशेज घाटात जणू मनमोहक हिरवाई पाहण्याचा अनुभव पर्यटाकांना मिळतो. त्यामुळे दर पावसाळ्यात हजरो पर्यटक माळशेज घाटातील धुक्याची चादर ओढलेल्या धबधब्यात चिंब भिजण्याचा आनंद घेण्यासाठी हजेरी लावतात. त्यातच हुल्लडबाज, मद्यपी, पर्यटकांची संख्या सार्वधिक असते. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात धबधब्यावर सहलीसाठी येणाऱ्या हुल्लडबाज पर्यटकांना रोखण्यासाठी ग्रामीण पोलीस सज्ज असल्याची माहिती राष्टीय महामार्ग पोलिस विभागाचे एपीआय अनिल विसपुते यांनी दिली आहे.
माळशेज घाट अपघाताच्या मालिकेने शापित : मुंबई पासून १५० किमी अंतरावर असलेल्या निसर्गसौंदयाची मजा लुटण्यासाठी मुबंई, ठाणे, नाशिक, नगर पुणे, जिल्ह्यातून हजारो पर्यटक माळशेज घाटात येतात. शिवाय हुल्लडबाज मद्यपी पर्यटक तर घाटातील फेसाळलेल्या धबधब्यात चिंब भिजण्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात. दुसरीकडे माळशेज घाट राष्टीय महामार्ग विभागाच्या हलगर्जीपणामुळे अपघाताच्या मालिकेने एकप्रकारे शापित ठरल्याचा आरोप स्थानिक गावकरी करीत आहेत. खड्डेमय रस्ता, घाटाच्या खोलदरी भागातील तुटलेल्या, मोडकळीस आलेल्या संरक्षण भिंती, दिशा दर्शक फलकांची वानवा, जिवघेणा प्रवास, अशा या धोकादायक असलेल्या माळशेज घाटातील निसर्गसौदर्याची मजा लुटण्यासाठी शनिवार,रविवार सुट्टीच्या दिवशी घाट हजारो पर्यटकांनी फुलून जातो.
घाटात शनिवार,रविवारी बंदोबस्त : त्यातच हुल्लडबाज पर्यटकांना रोखण्यासाठी घाट रस्त्यावर जागोजागी नाकाबंदी करण्यात येणार आहे. दारूसह अमली पदार्थाना घाटपरिसरात सक्त बंदी असून पर्यटकांच्या वाहनांचीही कसून तपासणी केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. शिवाय घाटात पेट्रोलिंग पथक स्थापन करण्यात आले आहे. हे पथक घाटात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यावर कार्रवाई करणार आहे. तसेच घाट रस्त्यावरील प्रत्येक धबधब्या जवळ पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. घाटात बंदोबस्तासाठी मुख्यालयातुन अतिरिक्त पोलिस बंदोबस्त पथकाला पाचारण केले आहे. तर टोकावडे पोलिस ठाण्यातील २० पोलिस पथकासह राष्ट्रीय महामार्ग विभागाचे २१ पोलिस असा किमान ४१ पोलिसांचा ताफा तैनात असणार आहे, अशी माहिती एपीआय अनिल विसपुते यांनी दिली आहे.
माळशेज'च्या पर्यटनावर दरडींचे सावट' : सह्याद्रीच्या अतिविराट, अतिराकट अजस्र शिळांच्या अंगाखांद्यावरून कोसळणारे फेसाळ धबधबे हे सह्याद्रीच्या पर्वत रांगांचे खास वैशिष्ट्य! याच पर्वतराजी मधील पर्यटकांना खुणावणारा माळशेज घाट म्हणजे सह्याद्रीच्या शिरपेचातला मनाचा तुराच ! दरवर्षी वर्षा सहलीचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी हजारो पर्यटकांची पावले आपसूकच याच माळशेजकडे वळतात. महाराष्ट्रातील पर्यटनाचे 'हॉट डेस्टीनेशन' असणारा हा घाट दरडी कोसळण्याची शक्यता असल्यामुळे पर्यटकांसाठी धोक्याचा बनला आहे.
घाटात कोट्यवधीचा खर्च; मात्र सुरक्षेच काय? : पर्यटन विकासाच्या नावाखाली माळशेज घाटात कोट्यवधी रुपये दरवर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खर्च करण्यात येतात. मात्र, तरीही येथील दरडी कोसळण्याचे सत्र दरवर्षी पावसाळ्यात सुरु होते. सुसज्ज पार्किंग व्यवस्था, संरक्षक कठडे, चकाचक रस्ता, यासाठी आजमितीला करोडो रुपये खर्च करुनही येथील अपघात रोखता आलेले नाहीत. निकृष्ट कामांमुळे तर, काही ठिकाणी संरक्षण कठडे देखील कोसळून पडल्याच्या घटना येथे घडलेल्या आहेत. यामुळे हा माळशेज घाट प्रवासाकरीता अंत्यत धोकादायक झालेला आहे. दरवर्षी पावसाळ्यात कोसळणाऱ्या दरडींच्या सावटाखाली अगदी जीव धोक्यात घालून येथून प्रवासी, वाहनचालकांना माळशेज घाट पार करावा लागतो आहे.