ठाणे - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बदनामीप्रकरणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्यावर भिवंडी न्यायालयात मानहानीचा खटला सुरू आहे. याची सुनावणी आज सकाळी साडेअकरा वाजता भिवंडी न्यायालयाचे न्यायाधीश शेख यांच्यासमोर झाली. मात्र, राहुल गांधी पाटणा न्यायालयात हजर झाल्याने त्यांच्या वतीने अॅडव्होकेट नारायण अय्यर यांनी खटल्याचे कामकाज पाहिले.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भिवंडीतील सोनाळे गावातील मैदानात राहुल यांनी महात्मा गांधींची हत्या आरएसएस वाल्यांनी केली, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर आक्षेप घेऊन भिवंडीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाहक राजेश कुंटे यांनी राहुल यांच्यावर भिवंडी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला होता.
राहुल यांच्याशी संबंधित आणखी एका दाव्याची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात ऑगस्टमध्ये होणार आहे. यामुळे फिर्यादी पक्षाचे वकील अॅडव्होकेट नंदू फडके व राहुल गांधींचे वकील नारायण अय्यर यांनी पुढील तारीख मिळावी अशी विनंती न्यायालयाला केली. ही विनंती मान्य करत न्यायालयाने राहुल यांना १९ ऑक्टोबरची तारीख दिली. ऑक्टोबरमध्ये राज्यात विधानसभा निवडणुका होणार असल्याने 19 ऑक्टोबरच्या सुनावणीसाठी राहुल गांधी स्वतः हजर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.