ठाणे - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते राजेश कुंटेंनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधींच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला ( RRS Defamation Case ) आहे. याप्रकरणी भिवंडी न्यायालयाच्या आदेशानंतर कुटेंनी खासदार गांधींच्या दिल्ली येथील कार्यालयात दीड हजारांची मनी ऑर्डर पाठवली आहे. गुरुवारी ( 28 एप्रिल ) ही रक्कम खासदार गांधी यांच्या दिल्लीतील कार्यालयात पोहचल्याची माहिती राहुल गांधींचे वकील नारायण अय्यर यांनी दिली ( Rajesh Kunte Sends Rahul Gandhi 1500 Rs ) आहे.
भिवंडी जलदगती न्यायालयाने २१ एप्रिल ( गुरुवारी ) राजेश कुंटेंना मानहानीच्या खटल्यात १,००० रुपये दंड भरण्याचे आदेश दिले होते. कुंटे यांनी स्थगिती अर्ज दाखल केल्यानंतर हा आदेश देण्यात आला. या दंडाशिवाय मार्चमध्ये तक्रारदाराने दिल्लीहून आणखी एक नोटरी साक्षीदार हजर करण्याची विनंती फेटाळल्यानंतर न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली होती. त्यावेळी न्यायालयाने तक्रारदार कुंटेंना दंड म्हणून ५०० रुपये भरण्यास सांगितले होते. परंतु, तक्रारदाराने दंडाची रक्कम भरली नाही. त्यातच गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी विरोधात दाखल केलेल्या दाव्याची सुनावणी दिवसभर भिवंडी जलदगती न्यायालयात सुरू होती. त्या दिवशी अनेकवेळा सुनावणी तहकूब करण्यात आली होती. तर, याचिकाकर्ते कुंटे यांनी भरावा लागणारा एकूण दीड हजार रुपयांचा दंड प्रलंबित होता.
याचिकाकर्ते कुंटे यांचे वकील गणेश धारगळकर म्हणाले, "न्यायालयाने दोन वेळा दंड भरण्यास सांगितले आहे. त्यामुळे नुकतेच आम्ही न्यायालयाच्या आदेशानुसार गांधी यांना पोस्टाने दीड हजार रुपये पाठवले आहेत." तर, राहुल गांधी यांचे वकील नारायण अय्यर यांनी सांगितले की, "तक्रारदाराने २१ एप्रिल रोजी पुन्हा स्थगिती देण्याची विनंती केली. परंतु, न्यायालयाने अर्ज नाकारला आणि राहुल गांधींना एक हजार देण्यास सांगितले. तसेच, सलग दुसऱ्यांदा त्यांना एकूण दीड हजार रुपये भरण्यास सांगितले. मात्र, याचिकाकर्ते कुंटेंनी सुनावणीला स्थगितीची विनंती केली. शिवाय मागील ५०० रुपयांचा दंड त्यांनी भरला नाही. म्हणून कुंटेंना एकूण दीड हजार रुपये भरावे लागले.
मला राहुल गांधी यांच्या दिल्लीतील कार्यालयातून फोन आला, त्यांनी तक्रारदार राजेश कुंटे यांच्याकडून दीड हजार रुपयांची मनीऑर्डर मिळाल्याची पुष्टी केली. आम्हाला आशा आहे की, मानहानी दाव्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार दररोज सुनावणी होईल. आता भिवंडी जलदगती न्यायालयात १० मे रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीच्या तारखेला पुरावे आणि साक्षीदार सादर करण्यास सांगितले आहे, अशी माहिती राहुल गांधींचे वकील नारायण अय्यर यांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण? - खासदार राहुल गांधींची 2014 साली लोकसभा निवडणुकीवेळी भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावातील मैदानात प्रचार सभा पार पडली होती. यावेळी बोलताना महात्मा गांधींची हत्या आरएसएसवाल्यांनी केल्याचे म्हटले होते. त्यानंतर भिवंडी न्यायालयात राजेश कुंटेंनी राहुल गांधी विरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने २०१८ मध्ये गांधी यांच्यावर आरोप निश्चित केले होते.