ठाणे - हाथरस येथील तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेमध्ये उत्तर प्रदेश सरकारची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करीत रिपाइं एकतावादीचे नेते महेश घारु यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले.
उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक अत्याचार प्रकरणातील 19 वर्षीय पीडितेचा दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. देशभरात या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. पीडितेला न्याय देण्याच्या मागणीसाठी देशभर आंदोलन केली जात आहेत. त्याच अनुषंगाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महेश घारु यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेचे दहन केले. यावेळी महेश घारु यांनी सांगितले की, रामराज्याची घोषणा करणार्या योगींच्या राज्यात दिवसाढवळ्या एका दलित कन्येवर अत्याचार होतो आणि रात्रीच्या अंधारात पुरावे नष्ट केले जातात; अशा मुख्यमंत्र्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. तर सबका साथ सबका विकास असे बोलणार्या मोदींच्या या मुख्यमंत्र्यांनी सामाजिक न्याय धुळीस मिळवला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.