ठाणे - काळजाचा थरकाप उडवणारी घटना कल्याण रेल्वे स्थानकावरील फलाटावर घडली आहे. घाईघाईने धावत्या एक्स्प्रेस पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा तोल जाऊन ती एक्स्प्रेस आणि फलाटाच्या गॅपमध्ये पडली. हे पाहताच सतर्कतेने काही सेकंदातच एका आरपीएफ जवानाने धाव घेऊन तिला रेल्वेखाली जाण्याअगोदरच बाहेर खेचल्याने त्या महिलेचे प्राण वाचले आहे. हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून ए. के. उपाध्याय असे महिला प्रवाशाचा जीव वाचविणाऱ्या आरपीएफ जवानाचे नाव आहे.
सामनासह घाईघाईने धावत्या एक्स्प्रेस पकडण्याचा प्रयत्न -
काल मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास एक महिला कल्याण रेल्वे स्थानकाच्या ४ नंबर फलाटावर विशाखापट्टणम एक्स्प्रेस पकडण्यासाठी आली होती. मात्र, एक्स्प्रेस सुरू झाल्याने या प्रवासी महिलेने सामनासह घाईघाईने धावती एक्स्प्रेस पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, यादरम्यान तिचा तोल गेल्याने ती एक्स्प्रेस आणि फलाटाच्या गॅपमध्ये पडली. याचवेळी ड्युटीवर तैनात असलेल्या आएपीएफ जवान ए. के. उपाध्याय यांनी हा प्रकार पाहिल्यावर लगेचच त्या प्रवासी महिलेला बाहेर खेचल्याने त्या महिलेचा जीव वाचला. त्यांनतर काही क्षणात एक्स्प्रेस थांबली असता त्याच एक्स्प्रेसमध्ये इतर रेल्वे पोलिसांच्या मदतीने त्या महिलेला पुढील प्रवासासाठी रवाना केले. या घटनेने आरपीएफ जवानाने दाखवलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक होत आहे.
हेही वाचा - पुणे - 'भारत बायोटेक'च्या प्लान्टसाठी तातडीने जागा देणार - उपमुख्यमंत्री अजित पवार