ठाणे- ठाण्यातील 'व्हेज कॅन्टीन' या हॉटेलच्या मालकांनी चक्क 'बेबी डॉल' नावाची स्त्री रोबोट जपानहून आणली आहे. ही रोबोट लोकांनी ऑर्डर केलेले पदार्थ त्यांना वाढते. हॉटेलचे मालक शैलेंद्र मौर्य आणि पूनम मौर्या यांनी १० लाख रुपयात या रोबोटची खरेदी केली असून महाराष्ट्रात अशा प्रकारचा हा पहिलाच रोबोट आहे.
रोबोटमध्ये टेबलचा नंबर टाकल्यावर तो बरोबर त्या नंबरच्या टेबलवर जाऊन जेवण वाढतो. हा रोबोट मॅग्नेटिक्स आणि वाईफाईद्वारे चालत असून आत्तापर्यंत चार ते पाच हजार ग्राहकांना त्याने जेवण वाढले असल्याची माहिती शैलेंद्र यांनी दिली आहे. जर एखादी व्यक्ती या रोबोटच्या मार्गात आली तर हा रोबोट त्या व्यक्तीला अत्यंत नम्रपणे "आपण माझ्या मार्गात उभे आहात, कृपया बाजूला व्हा "असे सांगतो. अशा या रोबोटला पाहणे म्हणजे एक पर्वणीच असल्याने खवय्यांची या हॉटलमध्ये गर्दी होत आहे.
हेही वाचा- मुरबाड : शिवसेनेच्या ' काट्याने काटा ' काढण्याच्या खेळीने भाजप चक्रव्यूहात !
आपण इथे आल्यावर जेव्हा वेटरच्या जागी या रोबोटने जेवण आणले तेव्हा आपल्याला आश्चर्य झाल्याचे सर्वच ग्राहकांनी सांगितले. तंत्रज्ञान किती प्रगत झाले आहे, हे या प्रयोगावरून दिसते आणि भविष्यात अनेक ठिकाणी असले रोबोट दिसले तर आश्चर्य वाटायला नको.