ठाणे - मंगल कार्यालयांमध्ये होणाऱ्या लग्नसोहळ्यांमध्ये होणारी धावपळ, गोंगाट आणि गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी लग्नातील दागिने आणि मौल्यवान ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. ठाणे शहरात अशा प्रकारच्या २ घटना घडल्या असून त्यात जवळपास सव्वा लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी लग्न सोहळ्यादरम्यान केलेले चित्रीकरण तपासले असून त्यामध्ये चोरटे थेट वधू-वरासाठी असलेल्या व्यासपीठावर वावरताना दिसून आले आहेत.
हेही वाचा - ठाण्यात नोकराने मारला 39 लाखांचा डल्ला, झारखंडमधून अटक
ठाणे तसेच घोडबंदर परिसरात मंगल कार्यालये असून त्याचबरोबर शहरातील हॉटेलमध्येही लग्न सोहळे पार पडतात. नोव्हेंबर महिन्यापासून लग्न सोहळ्यांना सुरुवात झाली असून त्यासाठी शहरातील मंगल कार्यालये आणि हॉटेल हाऊसफुल्ल झाली आहेत. लग्न सोहळ्यांना होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन चोरटे आता मंगल कार्यालयात शिरून सोन्याचे दागिने लंपास करू लागले आहेत. ठाणे आणि घोडबंदर भागात अशा प्रकारच्या दोन घटना घडल्या आहेत.
पहिली घटना 19 नोव्हेंबरला ओवळा येथील एका मंगल कार्यालयात घडली. डोंबिवली येथील वधूच्या पालकांनी तिला भेट देण्यासाठी 80 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने बनविले होते. हे दागिने वधूच्या आईने एका बॅगेत ठेवले होते. मुलगी आणि जावई या दोघांसोबत छायाचित्र काढण्यासाठी व्यासपीठावर गेली. त्यावेळी तिने दागिन्यांची बॅग सोफ्यावर ठेवली. कार्यालयात शिरलेल्या चोरट्यांनी बॅग लंपास केली. छायाचित्र काढून झाल्यानंतर मुलीला भेटवस्तू देण्यासाठी बॅग घेण्याकरिता गेले असता बॅग चोरीला गेल्याची बाब समोर आली. याप्रकरणी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सीसीटीव्ही चित्रीकरणाची मदत, लग्न सोहळ्यातील छायाचित्र आणि चित्रीकरण पोलिसांनी तपासले असून त्यामध्ये चोर पोलिसांना दिसले आहेत. वागळे इस्टेट आणि कासारवडवली या दोन्ही ठिकाणी झालेल्या घटनांमध्ये चोरटे वेगवेगळे आहेत की एकच आहेत, याचा शोध घेतला जात आहे. तसेच चोरट्यांना लवकरच अटक केली जाईल, असे कासारवडवली पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
चोरांची चोरी करण्याची पद्धत -
एखाद्या मंगल कार्यालयात किंवा हॉटेलमध्ये विवाह सोहळा सुरू असेल, तर त्याठिकाणी चोरटे वऱ्हाडी म्हणून आतमध्ये शिरकाव करतात. नातेवाईक आणि वऱ्हाडी मंडळींच्या अंगावरील सोन्याचे दागिने, मोबाईल आणि खिशातील पैसे यावर चोरटे नजर ठेवतात आणि संधी मिळताच चोरी करून तेथून पसार होतात, अशी चोरट्यांची कार्यपद्धती असल्याचे उघड झाले.
हेही वाचा - अज्ञात टोळक्याकडून अट्टल गुन्हेगाराचा भरदिवसा खून