ठाणे - एमएमआर परिसरात 60 टक्के रुग्ण हे ठाणे जिल्ह्यात आहेत आणि त्यातही महापालिका ही रेड झोनमध्ये आहे. आयुक्तांच्या बदलीनंतरही महापालिकेच्या हद्दीत सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे. अनेक रुग्णांना रुग्णवाहिका मिळत नसल्यामुळे मृत्यू वाढले आहेत. तर कोरोना व्यतिरिक्त आजार असलेल्या रुग्णांचे देखील मोठे हाल सुरू आहेत. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा ज्या सिव्हील रुग्णालयांवर अवलंबून आहे, ते रुग्णालय आता कोरोनासाठी झाल्याने सर्वच रुग्णांचे हाल होत आहेत.
एकीकडे लॉकडाऊनमध्ये गरीबाला दोन वेळ जेवण मिळत नाही. उत्पन्न बंद झाल्यामुळे आता बाधित झाल्यावर उपचार कसे घ्यायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. खासगी रुग्णालयात भरमसाठ बील येत असल्यामुळे रुग्ण प्रशासनाला घरीच उपचार करावे असे आवाहन करत आहेत. दुसरीकडे ठाण्यात टेस्ट करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. ठाण्यात अशा अनेक केस अजूनही समोर येत आहेत. ज्यांचा रिपोर्ट हा रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर आला आहे.
ठाणे शहरात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा ९ हजारांच्या पुढे गेला आहे. यापूर्वी दररोज १०० ते १५० रुग्णसंख्या सापडत असताना आता हेच प्रमाण दररोज ४०० पेक्षा अधिक वाढले आहेत. गेल्या १५ दिवसांमध्ये सर्वच महापालिकांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून यामध्ये ठाणे महापालिका हद्दीत सार्वधिक रुग्णांची संख्या वाढत असून त्या खालोखाल कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई महापालिकेचा क्रमांक लागतो. ठाण्यात केवळ रुग्णसंख्याच वाढत नसून मुर्त्यूंचे प्रमाण देखील वाढत असून गेल्या चार ते पाच दिवसात दररोज १५ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून ठाणे शहरासाठी हे अतिशय चिंताजनक आहे.
ठाणे महापालिका हद्दीत यापूर्वी आरोग्य अधिकाऱ्याने शिफारस केल्याशिवाय टेस्ट केली जात नव्हती. मात्र आता कोरोनाची संख्या मोठ्या संख्येने वाढली असल्याने नागरिकांच्या मनात भीतीचे वातारण निर्माण झाले आहे. ठाणे महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार ठाण्यातून आजच्या घडीला प्रत्येक दिवशी १०० ते १२०० टेस्ट केल्या जात आहेत. यातून ३०० ते ३५० नागरिक पॉझिटिव्ह येत आहेत. शहरात आतापर्यंत ४७ हजारांपेक्षा अधिक टेस्ट झाल्या आहेत. दररोज एवढ्या मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या वाढत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करून घ्यायचे कसे, असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. तर ठाण्यात होणारे मृत्यूदरही चिंतेचा विषय झाला आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या ३.५ टक्के मृत्यूदर आहे. काही दिवसांपूर्वीच आलेल्या केंद्रीय पथकांने रुग्ण वाढले तरी मृत्यूदर कमी करण्यावर भर द्या अशा सूचना केल्या होत्या. ठाण्यात विरोधकांनी याधी मृत्यूचे आकडे लपवल्याचे आरोप केले होते.
लॉकडाऊनचा उपयोग नाही
ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्रशासनाने लॉकडाऊन सुरु करण्यात आला आहे. पण त्याचा कोणताही फायदा रुग्णसंख्या कमी करण्यासाठी झालेला दिसत नाही. दिवसेंदिवस बाधितांचे आकडे हे वाढत आहेत.
खासगी रुग्णालय आणि बिल
ठाण्यात आतापर्यंत लाखो रूपयांची बिले दिल्यामुळे ठाण्यात अनेक आंदोलन झाली. मनसेने प्रशासनाला अनेकदा धारेवर धरल्यामुळे पालिका प्रशासनाने ठाण्यातील तीन रुग्णालयांवर कारवाई केली आहे.
ठाण्यात काही धक्कादायक प्रकार
महापालिकेने भूखंड दिलेल्या पाचपाखाडी येथील एका खासगी हॉस्पीटलमध्ये ८५ वर्षांच्या वृद्धाला बिलाचे २१ हजार रुपये न भरल्यामुळे रात्रभर थांबवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. वृद्धाच्या कुटुंबीयांनी धावपळ करून नातेवाईकांकडून पैसे आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी वृद्धाला रुग्णालयाबाहेर सोडण्यात आले. हा प्रकार 9 जून रोजी झाला होता.
2 मुंब्र्यातील बिलाल रुग्णालय, प्राईप क्रिटीकेयर रुग्णालय व युनिव्हर्सल रुग्णालयाबाबत महापालिकेकडे गर्भवती महिलेला उपचार न मिळाल्याने तिचे हाल होवून मृत्यूझाल्यानंतर पालिका प्रशासनाने या तिन्ही रुग्णालयावर गुन्हा दाखल केला
3 ठाण्यात खासगी लॅबचे अनेक रुग्णांचे रिपोर्ट चुकीचे आले. पोझिटिव्ह रुग्णांचे अहवाल महापालिकेने तपासणी केल्यावर निगेटिव्ह आहे. त्यामुळे महापालिकेने लॅबवर बंदी घातली.
4 आठ तास रुग्णवाहिका न आल्याने रुग्णाचा खुर्चीवर बसूनच मृत्यू
ठाणे जिल्हा अहवाल
एकूण - 130430
निगेटीव्ह -86505,
एकूण पॉझिटीव्ह -42420
एकूण मृत्यू -1268
अॅक्टीव्ह रुग्ण - 19861
बरे झालेले रुग्ण - 21291
ठाणे महापालिका
अॅक्टीव्ह रुग्ण -5201
बरे रुग्ण - 5128
मृत्यू - 402
कल्याण डोम्बिवली महापालिका
अॅक्टीव्ह रुग्ण - 5364
बरे झालेले रुग्ण - 3582
मृत्यू - 140
नवी मुंबई महापालिका
अॅक्टीव्ह - -3116
बरे झालेले रुग्ण - 4433
मृत्यू - 244
मीरा भायंदर महापालिका
अॅक्टीव्ह रुग्ण -1206
बरे झालेले रुग्ण - 2946
मृत्यू - 162
उल्हासनगर महापालिका
अॅक्टीव्ह रुग्ण -1501
बरे झालेले रुग्ण - 1256
मृत्यू - 53
भिवंडी निजामपूर महापालिका
अॅक्टीव्ह रुग्ण - 1024
बरे झालेले रुग्ण - 1175
मृत्यू - 120
अंबरनाथ नगर पालिका
अॅक्टीव्ह रुग्ण - 549
बरे झालेले रुग्ण - 1581
मृत्यू - 70
कुलगाव बदलापूर नगरपालिका
अॅक्टीव्ह रुग्ण - 542
बरे झालेले रुग्ण - 415
मृत्यू - 16
ठाणे ग्रामीण
अॅक्टीव्ह रुग्ण - 1358
बरे झालेले रुग्ण - 775
मृत्यू - 61
कल्याण डोंबिवलीला मिळाल्या 405 वाढीव खाटा, कोरोना रुग्णांना दिलासा
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी पुरेशा खाटा नसल्याने येथील रुग्णांना खाटेसाठी ठाणे व मुंबई या ठिकाणी धावाधाव करावी लागत होती. या पार्श्वभूमीवर कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी काही खासगी रुग्णालयांशी बोलणे सुरू असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. अखेर केडीएमसीने तातडीने निर्णय घेत उपलब्ध रुग्णालयांव्यतिरिक्त कल्याण डोंबिवलीतील आणखी नऊ रुग्णालये कोव्हिड उपचारासाठी उपलब्ध करून देण्याबाबतची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली आहे.
या रुग्णालयांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आता कोरोनाग्रस्तांसाठी आणखी 405 खाटा उपलब्ध झाल्या असून उपचाराचा मार्ग मोकळा झाला आहे. या वृत्ताला पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही दुजोरा दिला असून जाहीर केलेल्या यादीत रुग्णालयांचे लोकेशनही देण्यात आल्याचे ते म्हणाले. नवीन कोव्हिड रुग्णालयांपैकी 5 रुग्णालय हे कल्याण पश्चिम, 1 रुग्णालय कल्याण पूर्व आणि 3 रुग्णालये ही डोंबिवली पूर्व परिसरातील आहेत. त्यामुळे निऑन , हॉलिक्रॉस शास्त्रीनगर, आर. आर. बाज या रुग्णालयांसह केडीएमसी हद्दीत आता एकूण 13 रुग्णालयांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचार घेता येणार आहे.
नवीन 9 रुग्णालयांमधील एकूण 405 खाटांपैकी 297 जनरल खाटा , 79 आयसीयू खाटा तर 29 व्हेंटिलेटर खाटांचा समावेश आहे. त्यामुळे गंभीर लक्षण असलेल्या रुग्णांनाही ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरच्या शोधात ठाणे, मुंबई येथे वणवण फिरण्याच्या चक्राला तूर्त ब्रेक लागणार आहे.
दरपत्रकाचे पालन करावे
कोव्हिड रुग्णालये म्हणून जाहीर करण्यात आलेल्या खासगी रुग्णालयांनी केडीएमसीने ठरवून दिलेले दरपत्रक रुग्णालयात ठिकठिकाणी प्रसिद्ध करणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. काही रुग्णालये दरपत्रकाचे पालन करत नसून अवाजवी बिल लादत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे प्रशासनाने जाहीर केलेले दरपत्रक रुग्णालयात लावणे बंधनकारक करून खासगी रुग्णालयांवर अंकुश ठेवावा अशी मागणी जोर धरु लागली आहे. केडीएमसी हद्दीत साई आरोग्यम, साई रुग्णालय, ऑप्टिलाईफ , सिद्धीविनायक,श्वास, ए अँड जी, मीरा, स्टारसिटी आणि श्री स्वामी समर्थ या रुग्णालयांमध्येही कोव्हिड रुग्णांसाठी खाटा उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नवी मुंबई महापालिका आढावा
नवी मुंबईत सद्यस्थितीत ७९५७ कोरोनाचे रुग्ण आढळले असून, बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ५८ टक्के इतकं आहे. सानपाडा येथील खासगी रुग्णालयाने कमी लक्षणे असलेल्या रुग्णाला ३ दिवसाचे ६८ हजार रुपये बिल लावल्याने संबधित रुग्णाच्या कुटुंबियांनी रुग्णालय प्रशासनाविरुद्ध दाद मागितल्यानंतर त्यांना योग्य आकारणी करून बिल देण्यात आले. तसेच कोरोनामुक्त झालेल्या मुलाला डायलिसिसवर ठेवण्यास नकार दिल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना मे महिन्यात नवी मुंबईत घडली होती.
नवी मुंबईमध्ये सद्यस्थितीत तीव्र स्वरूपाची लक्षणे असणाऱ्या नागरिकांसाठी १० रुग्णालयांध्ये ८४९ खाटांचे नियोजन करण्यात आले असून सध्या २ रुग्णालयांमध्ये १४८ खाटा आहेत. या रुग्णालयीन सुविधांमध्ये १५०० ऑक्सिजन सुविधेसह खाटांचे नियोजन करण्यात आले असून ६२१ खाटा कार्यान्वित आहेत. तसेच १२१ आयसीयू खाटांचे नियोजन करण्यात आले असून ८६ खाटा कार्यान्वित आहेत. याशिवाय ७७ व्हेंटिलेटर्सचे नियोजन असून सध्या ४६ व्हेंटिलेटर कार्यान्वित आहेत.
वाशी सेक्टर ३० ए येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये १२०० खाटांचे करोना हेल्थ सेंटर उभारण्यात आले असून त्याठिकाणी ५०० ऑक्सिजनसह खाटांची सुविधा ठेवण्यात आलेली आहे. खासगी रुग्णालयांनी किती दर आकारावेत, याबाबत सरकारने मार्गदर्शक दरसूची जाहीर केली आहे. दरसूचीची काटेकोर अंमलबजावणी करावी व नागरिकांच्या माहितीसाठी ती रुग्णालयात नागरिकांना दिसेल अशा पद्धतीने प्रदर्शित करावी, असे आदेश सर्व खासगी रुग्णालयांना लेखी आदेश महापालिकेच्या माध्यमातून दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.