ठाणे - दिव्यांग असलेल्या सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याच्या घरात घुसून त्यांचे हात-पाय बांधून लुटल्याचा प्रकार समोर आली आहे. डोंबिवली पश्चिम परिसरातील गुप्ते रोडवरील एका इमारतीमध्ये घडली आहे. मात्र, घटनास्थळावरून पळताना एका आरोपीचा मोबाईल पडला. याच मोबाईलमुळे दरोडेखोरांचा सुगावा लागला. त्यामुळे शेजाऱ्यानेच शेजाऱ्याच्या घरावर दरोड्याचा टाकल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. शेजारी राहणारा मुख्यसूत्रधार दिनेश रावल याच्यासह चेतन मकवाना आणि अब्दुल शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर फरार झालेल्या महिला आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.
घरात घुसताच चाकूचा धाक दाखवून लुटपाट -
डोंबिवली पश्चिममधील गुप्ते रोडला असलेल्या सुरजमणी इमारतीत राहणारे सेवानिवृत्त बँक अधिकारी अशोक गोरी (61) या दिव्यांग व्यक्तिला लूटल्याची घटना घडली. मुलगी आणि पत्नी खरेदी करण्यासाठी घराबाहेर गेल्या असता तीन जण अशोक गोरी यांच्या घरात घुसले. त्यात एका महिलेचाही समावेश होता. मात्र, मुलगी घरी परत आल्याने लूटारुंचा डाव फसला. अशोक गोरी यांचे हात-पाय बांधून त्यांना बेदम मारहाण करीत त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावण्यात आली होती. इतकेच नाही, तर बाजारातून पुन्हा घरी आलेली त्यांची मुलगी प्रतीक्षा (२४) हिलाही गळ्यावर चाकू लावून मारहाण करण्यात आली. दरम्यान मुलीच्या आरडाओरड्याने लुटारू घाबरून घरात जे काही होते ते घेऊन पळून गेले. आरोपी पळ काढताना ते सीसीटीव्हीत कैद झाले होते. आरोपी पळत असतानाच त्यापैकी एकाचा मोबाईल गोरी यांच्या घरातच पडला होता.
मोबाईलमुळे लागला सुगावा -
गोरी यांनी पोलीस ठाण्यात अज्ञात चार आरोपींविरोधात दाखल करून आरोपींचा मोबाईल पोलिसांना दिला. त्यांनतर पोलिसांनी तपास सुरु केला. मिळालेल्या मोबाईलच्या आधारे आरोपींना शोधून काढले. मोबाईल ज्या आरोपीचा होता, त्याचे नाव चेतन मकवाणा आहे. तर चेतनसोबत इतर दोन आरोपी अब्दूल शेख आणि चंद्रीका ही महिला होती. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी चेतनने केलेला खुलासा हा धक्कादायक होता. अशोक गोरी यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर राहणारा दिनेश रावल याने या लूटीचा प्लान तयार केला होता. अशोक गोरी यांचा घरात बरच काही मिळेल, या आशाने दिनेश रावल याने हा प्लान केला होता. जेव्हा आरोपी घरात घुसले तेव्हा रावल हा खाली होता. तो अशोक गोरी यांच्या मुलगी व पत्नीवर नजर ठेवून होता. मुलगी घरी आल्यावर त्यानेच आरोपींना पळायला लावले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या प्रकरणी अशोक गोरी यांचे शेजारी दिनेश रावल, चेतन मकवाना आणि अब्दुल शेख यांना तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, आरोपी महिला अद्याप पसार आहे. शेजाऱ्याने शेजाराच्याचा घात केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकने लख्वीला जबाबदार धरावं - अमेरिका