ठाणे : येथे अँटीजन किट्सच्या माध्यमातून चाचणी करण्यासाठी येत्या शुक्रवारपर्यंत सर्व प्रभाग समित्यांमध्ये टेस्टिंग सेंटर्सचे नियोजन करून सोमवारपासून या सर्व ठिकाणी चाचणी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी घेतला आहे. या संदर्भात त्यांनी आज (बुधवार) परिमंडळ उप-आयुक्त तसेच सर्व प्रभागांचे सहाय्यक आयुक्त यांची बैठक घेतली.
अँटीजन किट्सच्या माध्यमातून चाचणी करण्यासाठी कोणत्या प्रकारची यंत्रणा निर्माण करण्याची आवश्यकता आहे, या विषयीच्या तयारीला पालीका प्रशासन लागले आहे. सध्या चार ठिकाणी ही सेंटर्स कार्यान्वित करण्यात आली आहेत. येत्या शुक्रवारपर्यंत सर्व प्रभाग समितीमध्ये ही सेंटर्स सुरू करण्याबाबत नियोजन करून ती सेंटर्स तेथील फिव्हर ओपीडीसी संलग्न करण्यात येणार आहे. चाचणीचा अहवालानुसार बाधित रूग्णास वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अभिप्रायानुसार त्यास कुठे दाखल करायचे आहे याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानुषंगाने आवश्यक ती सर्व कार्यवाही प्रभाग समिती स्तरावर करण्यात येणार आहे.
केवळ लक्षणे असणाऱ्यांचीच चाचणी
कोवीड-१९ रॅपिड अँटीजन किट्सच्या माध्यमातून सरसकट चाचणी करण्यात येणार नाही. तर, आयसीएमआरच्या मार्गदर्शक प्रणालीनुसार ज्यांना लक्षणे आहेत त्यांचीच चाचणी अँटीजन किट्सच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
लॉकडाऊन काळातील १२ दिवसांत महापालिकेचे मोबाईल ॲपच्या माध्यमातून ५ लक्षपेक्षा जास्त लोकांचे सर्वेक्षण
महापालिकेने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर केवळ १२ दिवसांत जवळपास ५ लाखांपेक्षा जास्त लोकांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले आहे. विशेष म्हणजे हे सर्वेक्षण मोबाईल ॲपच्या माध्यमातून करण्यात आले आहे. महापालिकेच्यावतीने २ जुलैरोजी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर पालिका प्रशासनाने रियल टाईम आकडेवारी प्राप्त व्हावी यासाठी मोबाईल ॲपच्या माध्यमातून सर्वेलन्स करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सिम्प्टो या मोबाईल ॲपच्या माध्यमातून सर्वेलन्स करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी प्रभाग समितीनिहाय आवश्यक ती पथके तयार करून त्यांना मोबाईल ॲपच्या माध्यमातून घरोघरी जावून कसे सर्वेक्षण करायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानुसार प्रभाग समितीनिहाय पथकांनी घरोघरी जावून गेल्या १२ दिवसांत जवळपास ५ लक्ष, ३ हजार, ७७५ इतक्या लोकांचे सर्वेक्षण केले आहे.