ठाणे - शिवसेना, भाजप युती झाली पाहिजे. अन्यथा मतांचे विभाजन होऊन काँग्रेसला फायदा होईल आणि सर्वाधिक नुकसान शिवसेनेचे होईल, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. भाजप-शिवसेनेनी एकत्र येण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे डोंबिवली शहराध्यक्ष अंकुश गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आठवले डोंबिवलीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
उद्धव ठाकरेंची भेट घेणार असून मुंबईत मराठी माणसाने उद्योग करण्याची भूमिका घेतली पाहिजे. आपण करत नसलेली कामे करायला उत्तर भारतीय लोक येतात. त्यामुळे सरकार मराठी तरुणांना स्किल डेव्हलपमेंट शिकवणार आहे. ३ वेळा लोकसभेत होतो. त्यामुळे यंदा पुन्हा लोकसभेत जाण्याची इच्छा आहे. यासाठी शिवसेनेच्या कोट्यातली दक्षिण मुंबईची जागा मागितली आहे. युती झाली तर आरपीआयची मते त्यांना मिळतील. त्यामुळे दक्षिण मध्य मुंबईची जागा मिळावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
वंचित आघाडीच्या मतांचा फायदा सेना-भाजप आघाडीला होणार. प्रकाश आंबेडकर वंचित आघाडीचे नेते आहेत. आपल्या पक्षाबाबत काय भूमिका घ्यावी? हा त्यांचा अधिकार आहे. मात्र, वंचित आघाडी वंचिताना सत्तेपासून वंचित ठेवणार आहे. त्या वंचिताना आवाहन आहे की, सत्तेसाठी तुम्ही एकत्र आले असाल तर तुम्ही माझ्यासोबत आले पाहिजे. प्रकाश आंबेडकरांसोबत जावून तुम्हाला सत्ता मिळणार नाही. वंचित समाजाचे लोक आमच्या सोबतच आहेत. काही नाराज लोक तिकडे गेलेले असले तरी महाआघाडीसोबत वंचित समाजाचे लोक सहभागी आहेत. यामुळे वंचित आघाडीला यश मिळणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
शरद पवार लोकसभेत येणार असतील तर आनंद आहे. मी लोकसभेत गेलो तर ते राज्यसभेत काय करतील? शरद पवार माढ्यातून उभे राहणार अशी माहिती आहे. त्यामुळे आठवले यांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या.