ठाणे Raid on Rave Party : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाणे तसंच मुंबईमध्ये होणाऱ्या पार्ट्यांवर पोलिसांकडून लक्ष ठेवून कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. अशातच ठाण्यातील कासारवडवली भागात आयोजित करण्यात आलेल्या एका रेव्ह पोर्ट पार्टीवर ठाणे गुन्हे शाखेनं कारवाई केलीय. या कारवाईत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ, 25 वाहनं तसंच 100 जणांना ताब्यात घेतलं असून या सर्वांची मेडिकल चाचणी झाल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.
100 जणांसह मोठ्या प्रमाणात नशेचं साहित्य जप्त : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील कासारवडवली परिसरात सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीत बेधुंद होऊन नाचणाऱ्या 100 तरुण तरुणींना गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलंय. यासोबतच चरस, गांजा, अल्कोहोल एमडी, एलएसडी अशा प्रकारचं नशेचं साहित्यही जप्त केलंय. या संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्यासाठी गुन्हे शाखेकडून लवकरच पत्रकार परिषद घेतली जाणार असल्याचं पोलीस सुत्रांनी सांगितलंय.
गुन्हे शाखेची मोठी कारवाई : मागील काही दिवसात ठाण्यातील बिघडलेली कायदा सुव्यवस्था ही विरोधकांच्या टीकेचा बळी ठरतंय. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरात जर असं होत असेल, तर संपूर्ण महाराष्ट्रात कसं होत असेल, असा प्रश्न अधिवेशनात देखील विचारला गेला होता. त्यानंतर ठाणे पोलीस आयुक्तालय हे आता आशुतोष डुंबरे यांच्या ताब्यात आल्यानंतर ठाणे पोलिसांनी धडाकेबाज कारवाईला सुरुवात केलीय. त्यातच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पार्टीवर धाड घालून गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केलीय.
कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठे अवैध धंदे : ठाण्याच्या कासारवडवली पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक मोठे अवैध धंदे असून, याच ठिकाणी सकाळपर्यंत चालणारे पब, हुक्का पार्लर देखील मोठ्या प्रमाणात आहेत. अनेक मसाज पार्लर आणि नव्यानं वाढणारा शहरी भाग आहे. त्यामुळं या रेव्ह पार्टीची माहिती स्थानिक पोलिसांना कशी नव्हती आणि एवढं मोठं आयोजन करुन कोणी पार्टी आखली, यात कोणकोणत्या लोकांचा सहभाग आहे, याचा शोध गुन्हे शाखा घेणार आहे.
हेही वाचा :