ठाणे - ठाण्यात लाखो लोक हजारो धोकादायक इमारतीत राहत आहेत. पर्यायी घर नसल्यामुळे जीव गेला तरी चालेल पण घर सोडणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. ठाणे महापालिकेने मान्सूनपूर्व मे महिन्यात धोकायदाक इमारतींचे सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये तब्बल अडीच लाखांपेक्षा अधिक नागरिकांचे वास्तव्य धोकादायक इमारतींमध्ये असल्याचे उघड झाले आहे.
ठाणे महापालिकेच्या हद्दीमधील एकूण लोकसंख्येच्या १० टक्के नागरिक हे धोकादायक इमारतींमध्ये राहत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांची संख्या ८६ हजारांनी वाढली आहे. विशेष म्हणजे, ८८ टक्के धोकादायक इमारती या अनधिकृत आहेत. एकूण ४ हजार ५०७ धोकादायक इमारती ठाणे, मुंब्रा, दिवा, वागळे व इतर भागात असल्याची आकडेवारी समोर आली आहे.
आता महापालिकेने या अनधिकृत इमारती जर लवकरात लवकर खाली केल्या नाहीत, तर मुंबईतील डोंगरी परिसरातील कैसरबाग इमारत दुर्घटना किंवा ठाण्यातील मुंब्रा येथील लकी कंपाउंड मधील झालेली इमारत दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापालिकेच्या वतीने मान्सूनपूर्व मे महिन्यात शहरातील अनधिकृत इमारतींचे आणि त्यात नेमके किती लोक राहत आहेत, यासंदर्भात माहिती घेण्यासाठी धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये ४ हजार ५०७ इमारती या संपूर्ण शहरात धोकायदायक असल्याचे स्पष्ट झाले.
या इमारतींमधील कुटुंबीयांची संख्या लक्षात घेतल्यावर ती ५६ हजार ५२२ इतकी म्हणजे जवळपास अडीच लाखांपेक्षा अधिक नागरिकांचे वास्तव्य अजूनही या धोकादायक इमारतींमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर याबाबत नागरिकांना क्लस्टर योजनेमध्ये सामावून त्यांना राहण्यास कधीपर्यंत मिळणार असा सवाल धोकादायक इमारतीत राहणारे करीत आहेत. आधी आम्हाला राहण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्या, तेव्हाच आम्ही घर खाली करू अशी मागणी नागरिक करीत आहेत.
या धोकादायक इमारती अजूनही रिकाम्या करण्याचे काम सुरू असल्याचे अतिक्रमण विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.