ठाणे - कोरोनाच्या या महासंकटामुळे केंद्र सरकारला संपूर्ण देश लॉकडाऊन करावा लागला. अनेक उद्योगधंदे बंद पडले. अनेक लोकांचे रोजगार गेले. रोजगार गेल्यामुळे अनेकांना नैराश्य देखील आले. काही लोकांनी लॉकडाऊनच्या या कालावधीत आलेल्या नैराश्यामुळे नकारात्मक होऊन आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या. मात्र, काही जणांनी याच लॉकडाऊना सकारात्मक दृष्टोनातून पाहिले. लॉकडाऊन ही आपल्याला असलेली सक्ती नसून एक संधी आहे, असे मानले. त्याच दृष्टिकोनातून तब्बल 14 वर्षे देहव्यापार व्यवसायात नरकयातना भोगलेल्या काही महिलांनी एक सकारात्मक निर्णय घेतला आहे. ठाण्यातील चौघांनी यापुढे सर्वसामान्य जीवन जगण्याचा संकल्प केला आहे. यापुढे आम्ही स्वावलंबी होऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहू, अशी प्रतिक्रिया या देहव्यापार सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामिल होणाऱ्या एका 30 वर्षीय महिलेने व्यक्त केली आहे.
देहव्यापाराच्या अंधकारमय यातनादायी जीवन जगताना कोरोना संकटात करण्यात आले. यामुळे देहविक्री व्यवसाय कोरोनाच्या भीतीने बंद करण्यात आला. त्यानंतर जगायचे कसे असा प्रश्न देहव्यापार करणाऱ्या महिलांना पडला होता. मात्र, एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जवळपास ५०० वारांगनाना स्वावलंबनाचे धडे दिल्यानंतर त्यांच्या जीवनात नव्या उमेदीने पुन्हा जीवन जगायची आशा निर्माण झाली.
एका संस्थेच्या माध्यमातुन आता या महिलांना स्वतःच्या ‘चिची हाऊस’ घरात प्रवेश करून सर्वसामान्य जीवन जगण्याची नवी उमेद मिळाली आहे. भिवंडी शहरात हनुमान टेकडी परिसरात देहव्यापार करणाऱ्या महिलांची वस्ती आहे. याठिकाणी जवळपास 500 वारांगना असतात. याठिकाणी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून श्री साई सेवा संस्थेच्या स्वाती (सिंग) खान यांनी चार वर्षांपूर्वी सामाजिक आरोग्य विषयक कार्यास सुरुवात केली होती. त्यामुळे या महिलांशी या काळात स्वाती खान यांचे स्नेहाचे संबंध निर्माण झाले.
मार्च महिन्यात देशभरात कोरोना विषाणूने थैमान घालण्यास सुरुवात केली. यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २५ मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा केली. या काळात असंख्य उद्योग व्यवसाय बंद असतानाच स्वाती खान यांच्या नेतृत्वाखाली येथील महिलांनी कोरोनाचा संसर्ग टाळावा, यासाठी आपले रोजगार असलेला देहव्यापार व्यवसायही बंद करण्याचा निर्णय घेतला. या काळात संस्थेच्या माध्यमातून त्यांनी विविध समाजसेवी संस्थांनी या महिलांसाठी धान्य, किराणा साहित्य आजपर्यंत पुरविले. मात्र, त्यांच्या पोटाची भूक भागवून स्वस्थ न बसता स्वाती खान यांनी या महिलांना काहीतरी रोजगार उपलब्ध करून देण्याचे ठरवले.
यानंतर खान यांनी येथील २५ महिलांना अगरबत्ती पॅकिंग, दिवाळी शोभेची लायटिंग बनविणे या कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबनाचे धडे दिले. हळूहळू या कामातून पैसे मिळायला लागल्याने देहव्यापार करून जीवन व्यतीत करणाऱ्या चार महिलांनी देहव्यापार बंद करून सर्वसामान्य महिलांचे जीवन जगण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी स्वाती खान यांनी या परिसरातील चार खोल्या भाड्याने घेऊन त्यास रंगरंगोटी करून नव्या स्वरूपातील घर या महिलांच्या ताब्यात दिले. त्याचा लोकार्पण सोहळा आणि या महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा कार्यक्रम शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या महिलांनी देहव्यापार व्यवसायाचा त्याग करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या महिलांचे समुपदेशन करुन त्यांचा निर्धार ठाम आहे का? हेदेखील स्वाती खान यांनी पाहिले. खान यांनी या महिलांसाठी घराची व्यवस्था केली. तसेच त्यांना पैशांसाठी कोणाकडे हात पसरण्याची वेळ येणार नाही, असा रोजगार त्यांना उपलब्ध करून दिला. या महिलांसाठी 'चिची हाऊस' ची संकल्पना त्यांनी राबविली. चिची हाऊस या मल्याळम शब्दाचा अर्थ होतो 'बहिणीचे घर' असे आहे. या महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याने मनाला आत्मिक समाधान मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया श्री साई सेवा संस्थेच्या प्रमुख स्वाती सिंग-खान यांनी दिली.