ठाणे - सध्या कल्याण डोंबिवलीत कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यात शिवसेनेची सत्ता, ठाण्यात शिवसेनेचे मंत्री, कल्याणात शिवसेनेचा खासदार, आमदार, महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता असूनही केवळ राजकीय इच्छाशक्ती आणि समन्वयाअभावी ही परिस्थिती आली आहे. अशात येत्या 8 दिवसांत कल्याण डोंबिवलीतील परिस्थिती सुधारली नाही, तर भाजपतर्फे उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.
कल्याण डोंबिवलीतील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर दरेकर यांनी आज महापालिका आयुक्तांसोबत आढावा बैठक घेतली. तसेच केडीएमसीच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयालाही भेट देऊन पाहणी केली. रुग्णालयातील व्यवस्था आणि समन्वयाच्या अभावामुळे कल्याण डोंबिवलीत मृत्यू वाढत चालल्याचा आरोप दरेकर यांनी यावेळी केला. महानगरपालिका आणि राजकीय नेतृत्वामध्ये ताळमेळ नाही. ऑक्सिजन, व्हेंटीलेटरसाठी जास्त निधी लागत नाही. मात्र, त्यासाठीही महापालिका उपाययोजना करू शकत नाही. हे सत्ताधाऱ्यांचे अपयश असल्याची टीकाही दरेकर यांनी यावेळी केली.
या सर्व मुद्द्यांबाबत आजच्या बैठकीत महापालिका आयुक्तांशी चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच येत्या 8 दिवसांत कल्याण डोंबिवलीच्या परिस्थितीत बदल दिसला नाही, तर भाजपतर्फे उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दरेकर यांनी यावेळी दिला. तर, पर्यवरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात उपाययोजनांबाबत न्याय आणि कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या ठाणे, कल्याण डोंबिवलीमध्ये का नाही, असा सवाल माजी राज्यमंत्री आमदार रविंद्र चव्हाण यांनी उपस्थित केला.
या बैठकीला खासदार कपिल पाटील, आमदार गणपत गायकवाड, भाजप सरचिटणीस नरेंद्र पवार, केडीएमसी विरोधीपक्ष नेते राहुल दामले, माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर उपस्थित होते. या बैठकीनंतर दरेकर यांनी डोंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयाला भेट देत पाहणी केली. त्यामध्ये या रुग्णालयात व्हेंटीलेटरही उपलब्ध नसल्याचे समोर आले. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे तातडीने व्हेंटीलेटर उपलब्ध करून देण्याची मागणी केली.