ठाणे - शहरात कोरोना काळामध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी खूप काम केले. सत्ताधारी शिवसेनेने मात्र, बघ्याची भूमिका घेतली होती. दिवंगत नेते आनंद दिघे यांनी कायम सामाजिक बांधिलकी संपली मात्र, त्यांची जागा आता भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे येणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाणेकर भाजपाला सहकार्य करतील. महापलिकेवर भाजपाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला.
नाचता येईना अंगण वाकडे -
राज्यात सत्ता स्थापन कारण्यासाठी शिवसेनेने हिंदुत्वचा झेंडा खांद्यावरून उतरवला. सध्या शिवसेनेची स्थिती 'नाचता येईना अंगण वाकडे', अशी झाली आहे. प्रत्येकवेळी राज्य सरकार म्हणून स्वतः काही करायचे नाही आणि नेहमी केंद्र सरकारकडे बोट दाखवायचे. त्यांचे हेच उद्योग सध्या सुरू आहेत, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.
भाजपा हिंदू धर्माची पताका जपतो आहे -
कोपरीत सुरू असणाऱ्या धार्मिक कार्यक्रमामुळे, ठाण्यात हिंदू धर्माची पताका जपण्याचे काम करत असल्याचे जनतेला दिसत आहे. ठाण्यात भाजपाचे काम योग्य पद्धतीने सुरू असून कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. कोरोना काळात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी लोकांसाठी धावपळ करून समाजसेवा केली. आनंद दिघे यांची सामाजिक बांधिलकी आणि दिघे यांच्या कामाचा वसा खऱ्या अर्थाने भाजपाच्या कार्यकर्त्यांनी उचललेला असल्याचे स्पष्ट चित्र दिसत असल्याचे प्रवीण दरेकर प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
उपमुख्यमंत्र्यांचे वक्तव्य दुर्दैवी
पोलिसांच्या मागे चोर धावत असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वक्तव्य केले होते. सरकारमध्ये असूनही अजित पवारांचे हे वक्तव्य दुर्दैव आहे. त्याचबरोबर कायदा सुव्यवस्था जोपासण्यात हे सरकार अपयशी आहे. पोलिसांचे मनोबल आणि यंत्रणा वाढवली जात नाही. पोलिसांची प्रतिमा मालिन होत असून, त्याचबरोबर सरकारची प्रतिमा मालिन होत आहे, अशी टीका देखील यावेळी प्रवीण दरेकर यांनी केली.