मीरा भाईंदर(ठाणे)- शहरातील अनधिकृत लॉजिंग-बोर्डिंग आणि काही ठिकाणी करण्यात आलेले वाढीव बांधकाम तोडण्यात यावे. लॉज अनैतिक व्यवसायाचे केंद्र बनत चालले आहेत त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी मनपा आयुक्त डॉ. विजय राठोड आणि नवनिर्वाचित पोलीस आयुक्त सदानंद दाते यांची भेट घेऊन आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
मार्चमध्ये करण्यात आलेल्या टाळेबंदीचा फायदा घेत अनेक ठिकाणी शहरात अनधिकृत बांधकाम वाढली आहेत. त्यात शहरातील अनधिकृत लॉज यांचे प्रमाण जास्त आहे. मीरा भाईंदर मध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढतच आहे. लॉजिंगमध्ये अनैतिक व्यवसाय सुरु आहेत, त्यामुळे कोरोनाचा कहर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. त्यामुळे अनधिकृत बांधकामे तोडण्यात यावी, असे पत्र आमदार प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर मनपा आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी भेट घेऊन दिले.
मीरा भाईंदर शहराच्या वेशीवर साई सनिधी रेस्टोरंट आणि बार बेकयार्ड बीअर गार्डन, आर हापी ब्रीविंग कंपनी, तसेच स्प्रिंग लॉजिंग व बोर्डिंग येथे अनधिकृत बांधकामे झाली असून बार व लॉजमध्ये अनधिकृतपणे छुप्या खोल्या बांधण्यात आल्या आहेत. या ठिकाणी कोणते गैरप्रकार चालतात हे उघड आहे. अनधिकृत लॉजमुळे अनैतिक व्यवसाय वाढत चालले आहेत,असे सरनाईक यांनी म्हटले आहे.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांचाशी अर्थपूर्ण व्यवहार करून ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळामध्ये ही बांधकामे झाली आहेत त्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी केली पाहिजे. गेल्या ५ महिन्यात झालेली ही अनधिकृत बांधकामे तोडण्यासाठी महापालिकेने कालबद्ध मोहीम आखून सर्व बांधकामे तात्काळ तोडून टाकावीत. या महिन्यातच ही मोहीम पूर्ण करावी. तरुण पिढीला बरबाद करणारी ही अनैतिक व्यवसायाची केंद्रे असून त्यामुळे गंभीरपणे त्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. मीरा भाईंदरच्या तरुण पिढीला बरबाद होण्यापासून वाचविण्यासाठी पालिकेने प्रामाणिकपणे कारवाई करावी. भविष्यात अशी अनैतिक व्यवसाय केंद्रे परत उभी राहू नयेत म्हणून कडकपणे कारवाई करावी, अशी मागणी सरनाईक यांनी केली आहे.
अनधिकृत व विनापरवाना चालणाऱ्या हॉटेल, रेस्टोरंट, बार, पब, लॉजिंग, बोर्डिंगची यादी तयार करून त्यावर नियमाप्रमाणे कडक कारवाई करावी. अन्यथा २ ऑक्टोबर गांधी जयंती दिवशीच आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार प्रताप सरनाईक यांनी मनपा आयुक्त डॉ. विजय राठोड यांना दिला आहे. कोविड सेंटर मध्ये घडलेल्या बलात्कार प्रकरणी सरनाईक यांनी पोलीस आयुक्त सदानंद दाते यांची भेट घेतली. संबंधित आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावेत. घडलेल्या प्रकारची सखोल चौकशी करावी, अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केली आहे.