ठाणे- सध्या सुरु असलेल्या पर्यूषण पर्व काळात दोन दिवस जैन मंदिरे उघडण्याची सशर्त परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. जैन मंदिरे उघडण्यास सशर्त परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली त्यामुळे राज्यातील हिंदू धर्मियांची मंदिरे व इतर धर्मियांची प्रार्थना स्थळे उघडण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घ्यायला हवा, अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
राज्यात गणेशोत्सव सुरु झाला आहे. त्यानंतर नवरात्र उत्सव सुरु होईल. आगामी काळात हिंदू धर्मियांचे हे सगळ्यात मोठे उत्सव सुरु होत आहेत. सर्वच धर्माचे भाविक आपापली प्रार्थना स्थळे खुली करण्याची मागणी सरकारकडे करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिले आहेत, त्याचा अभ्यास करुन सरकारने पुढील निर्णयाबाबत विचार करावा,अशी मागणी सरनाईक यांनी केली आहे.
राज्य 'अनलॉक'च्या दिशेने वाटचाल करत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरेदेखील उघडावीत, अशी मागणी भाविकांमधून मोठ्या प्रमाणात होत आहे. राज्य सरकारने मॉल्स आणि इतर आर्थिक व्यवहार सुरु करण्याची परवानगी दिलेली आहे. मात्र, मंदिरे उघडण्यास परवानगी दिलेली नाही, यावरुन लोक प्रश्न विचारत आहेत. मॉल्स , मार्केट कॉम्प्लेक्स अशी गर्दीची ठिकाणे सुरु होऊ शकतात मग मंदिरे का नाही ? असा भाविकांचा प्रश्न आहे. त्यामुळे राज्य सरकारने याबाबत त्वरित निर्णय घेणे गरजेचे आहे, असे मत प्रताप सरनाईक यांनी पत्राद्वारे उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडले आहे.
गेल्या ५-६ महिन्यात नागरिकांना सामाजिक अंतर कसे ठेवायचे व स्वतःची काळजी कशी घ्यायची हे समजले आहे. त्यामुळे राज्य सरकारने जी नियमावली ठरवली आहे त्या नियमांचे पालन करण्याची हमी घेऊन, जैन मंदिराप्रमाणेच सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे उघडण्यास राज्यात परवानगी द्यायला हवी, अशी विनंती ही पत्रात केली आहे.