नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत लॉकडाऊन वाढवले आहे. मात्र, काही लोक लॉकडाऊनचे उल्लंघन करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या महाभागांना धडा शिकवण्यात आला असून, त्यांच्या कडून दंड वसुली करण्यात आली आहे.
नवी मुंबई शहरात लॉकडाऊन झाल्यापासून सवलतींचा गैरफायदा घेऊन फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कंबर कसली आहे. परिसरात लॉकडाऊन दरम्यान नियमांचे उल्लंघन करून विनाकारण दुचाकी व चारचाकी घेऊन फिरणाऱ्या महाभागांना पोलीस प्रशासनाने चांगलाच दणका दिला आहे. कलम 173 व 179 च्या अनुषंगाने कारवाई करून दंड वसुली करण्यात आली आहे.
नवी मुंबई कोरोनाग्रस्त रुग्णांचा वाढता आकडा पाहता कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी शहरात 19 तारखेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. मात्र, तरीही काही लोक लॉकडाऊन गंभीरपणे घेत नसल्याने कोपरखैरणे परिसरात ही कारवाई केली असल्याचे कोपर खैरणे पोलीस ठाण्याचे एपीआय सागर धुमाळ यांनी सांगितले.