ठाणे - महाराष्ट्र कोरोनाच्या संकटाशी सामना करत आहे. मात्र संचारबंदीतही चक्क मैदानात लग्न सोहळा उरकून घेण्याचे काही महाभागांना पडले होते. मात्र जागृत नागरिकाने वेळेत पोलिसांशी संर्पक करुन माहिती दिल्याने हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या महाभागांसह वर-वधूलाही ताब्यात घेतले आहे.
डोंबिवलीत लग्न सोहळ्यामुळे कोरोना विषाणूचा फैलाव होऊन अनेकांना कोरोनाची लागण झाल्याची घटना ताजी आहे. असे असतानाच उल्हासनगरमध्येही भर दुपारी चक्क मैदानातच लग्न सोहळा पार पडत होता. विशेष म्हणजे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने १४ मार्चपासून महाराष्ट्रात सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळे, सर्वच धार्मिक कार्यक्रमावर बंदी घातली आहे. असे असतानाही या महाभागांनी संचारबंदीतही चक्क मैदानात लग्न सोहळा आयोजित केला होता.
मात्र जागृत नागरिकाने वेळेत पोलिसांशी संर्पक करुन माहिती दिल्याने पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी सामाजिक अंतर न ठेवता दसेरा मैदानात १५ ते २० जणांचा जमाव एकत्र दिसून आला होता. दरम्यान, हिल लाईन पोलिसांनी वर-वधूसह आयोजकांना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांवत यांनी दिली आहे.