ठाणे - टाळेबंदीपासून आतापर्यंत सुमारे अकरा वेळा इंधनाच्या दरामध्ये वाढ झाली आहे. कोरोनामुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आलेला असताना इंधनाच्या दरवाढीमुळे महागाईत वाढ होऊन सामान्यांना जगणे नकोसे झाले आहे. भाजपच्या महाराष्ट्रातील पुढार्यांना ही दरवाढ दिसत नाही का, असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनाच निवेदन देऊन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंधन दरवाढ कमी करण्यासाठी विनंती करावी, या मागणीसाठी ठाण्यातील शेकडो राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सायकल मोर्चा काढला. मात्र, ठाणे पोलिसांनी या मोर्चेकर्यांना नितीन कंपनी सिग्नल येथेच अडवून ताब्यात घेतले.
अच्छे दिनचे स्वप्न दाखवत केंद्रात सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशात महागाईचा आगडोंब उसळविला आहे. पेट्रोल पंप म्हणजे ‘मोदी वसुली केंद्र’ झाले आहेत. या दरवाढीचा निषेध करण्यासाठी ठाण्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादीचे युवा प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि ठाणे युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांच्या नेतृत्वाखाली सायकल मोर्चा काढण्यात आला.
पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांक गाठला असून, सध्या पेट्रोलने नव्वदी पार केली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर नियंत्रणमुक्त केल्यामुळे पेट्रोलियम कंपन्या रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल करत असतात. पेट्रोलची मूळ किंमत कमी असताना जास्त दराने विक्री करून जनतेची आर्थिक लूट केली जात आहे. रोज दरवाढ करण्याऐवजी तीन महिन्यांनी दरांमध्ये फरक करावा. पेट्रोल-डिझेलचे इतर कर काढून वस्तू व सेवा कराच्या कार्यकक्षेत घ्यावे, तसेच महाराष्ट्र व लगतच्या राज्यातील पेट्रोल-डिझेलची किंमत एकसमान करावी, अशा मागण्या अनेकवेळा करण्यात आल्या. पण, त्याकडे दुर्लक्ष करण्यात केंद्र सरकार माहिर झाले आहे. आजवर केलेल्या आंदोलनांची निवेदने जिल्हाधिकार्यांच्या माध्यमातून पंतप्रधानांना पाठविण्यात आलेली आहेत. मात्र, त्याची दखल घेतली जात नसल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाणे ते मुंबई भाजप प्रदेश कार्यालय, असा सायकल मोर्चा काढला होता. सुमारे 500 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयापासून मुंबईच्या दिशेने सायकल चालवत कूच केले. या आंदोलनात युवकांसह युवती, महिलांचाही मोठा सहभाग होता. मात्र, नितीन कंपनी जंक्शन जवळ पोलिसांनी मोर्चेकर्यांना अडवून पुढे जाऊ दिले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तिथेच जोरदार घोषणाबाजी करीत रस्ता अडवून धरला.
कच्च्या तेलाचे दर कमी असुनही वाढ
आता कच्च्या तेलाच्या किंमती कमी झालेल्या असताना तसेच साठवण क्षमता वाढलेली असतानाही इंधनाचे दर दररोज वाढतच आहेत. आज (दि. 14 जाने.) पेट्रोलचे दर 91.18 रूपये तर डिझेलचे दर 81.44 रुपयांवर गेले आहेत. इंधनाचे दर कमी करण्यासाठी अनेकदा निवेदने दिली आहेत. मात्र, केंद्र सरकार त्याकडे लक्ष देत नाही. म्हणूनच हे दर कमी केले नाहीत, तर ठाण्यात एकही केंद्रीय मंत्र्याला येऊ देणार नाही, असा इशारा दिला.
हेही वाचा - भटक्या श्वानावर अत्याचार करणाऱ्या विकृताला ६ महिन्यांचा कारावास
हेही वाचा - दोन महिला उमेदवारांच्या पती नामसाधर्म्याने सोशल मीडियावर गोंधळ