ठाणे - राज्यशासनाने बंदी घातलेल्या गुटख्याचा साठा मुंब्रा बायपास परिसरातून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने मुंब्रा पोलिसांच्या मदतीने हस्तगत केला आहे. तब्बल १५ लाख २४ हजार ९७० रुपयांचा विविध गुटखा आणि सुंगंधीत पानमसाला व टेम्पो हस्तगत केला आहे. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप बाबाजी कुंटे (वय ४० वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी, संशयीत आरोपी मोहम्मद इर्शाद शेख (वय ३३ वर्षे, रा. प्लॅट नं ए-३०३ अल फुर्रकन, ग्लोबल पार्क को. ऑप. हौ. सोसायटी मुंब्रा बायपास जवळ, मुंब्रा) याने अन्न व सुरक्षा विभागाने प्रतिबंधित केलेल्या विमल पानमसाला, व्ही टेबॅको, पुकार पानमसाला, पुकार च्युईंग तंबाखू मिश्रित करून गुटखासदृश पदार्थ तयार होणार साठा केला आहे, अशी माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषधी प्रशासनाचे पथक आणि मुंब्रा पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत पथकाने तब्बल १५ लाख २४ हजार ९७० रुपयांचा साठा व एक टेम्पो हस्तगत केला. अन्न व औषधी पथकाच्या तक्रारीनुसार मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.