ठाणे - ठाण्यातील घोडबंदर रोड येथे राहणाऱ्या अनिता ओमवीर सिंग यांचा मुलगा सचिन यांचा लग्न समारंभ जलसा लॉन येथे आयोजित केला होता. यावेळी लग्न समारंभात फोटो काढत असताना अनिता सिंग यांनी खुर्चीवर ठेवलेली सोन्याची बॅग काही क्षणात चोरीला गेल्याची घटना 30 नोव्हेंबर 2020 रोजी घडली होती. चोरीला गेलेल्या बॅगेत 423 ग्रॅम सोन्याचे दागिने होते. या घटने प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पोलिसांनी मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यातील बबलू सुमेरसिंग सिसोदिया या व्यक्तीच्या घरातून चोरी गेलेला 19 लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे.
आरोपी अद्यापही फरार -
लग्न समारंभात फोटो काढत असताना अनिता सिंग यांनी खुर्चीवर ठेवलेली दागिन्यांची बॅग अज्ञात चोराने चोरून नेली होती. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी असलेले सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास सुरू केला होता. या गुन्ह्याचा तपास केल्यानंतर ही चोरी मध्यप्रदेश येथील राजगढ जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगार बबलू सुमेरसिंग सिसोदिया व त्याच्या दोन साथीदाराने केल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्यानंतर कासारवडवली पोलिसांचे एक पथक मध्यप्रदेशातील राजगढ जिल्यातील गुलखोडी या ठिकाणी चोरांना पकडण्यासाठी आठ दिवसांपासून तळ ठोकून होते. परंतु आरोपींना याचा सुगावा लागल्या मुळे ते पळून गेले. मात्र, चोरी गेलेले सगळे दागिने बबलूच्या घरी मिळून आल्याने पोलिसांनी ते हस्तगत केले. या घटनेतील फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
लग्न समारंभात सतर्क राहणे गरजेचे -
लग्न समारंभात नागरिकांनी सतर्क रहाणे गरजेचे आहे. लहान मुलांचा वापर करुण अशा प्रकारे अनेक गुन्हे होत असतात. जेव्हा लोकांचे लक्ष इतर ठिकाणी जाते, तेव्हाच अशा चोरीच्या घटना घडत असतात, म्हणून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
हेही वाचा - अमरावती: राज्यमंत्री बच्चू कडूंंनी केले आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटूंबाचे सांत्वन