ठाणे - आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका ४५ वर्षीय विवाहितेला पोलिसाने वाचवले आहे. पोलीस नाईक गजेंद्र सोनटक्के असे या जीव वाचवणाऱ्या पोलिसाचे नाव आहे. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता थेट उपवन तलावात उडी मारत महिलेचा जीव वाचवला.
ठाण्यातील उपवन परिसरात पोलीस नाईक गजेंद्र सोनटक्के आणि पोलीस नाईक संतोष मोरे हे दोघे शुक्रवारी सायंकाळी 7च्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना दोन मुली त्यांच्याजवळ धावत आल्या आणि त्यांनी एक महिला उपवन तलावात आत्महत्या करणार आहे, असे सांगितले.
तेव्हा क्षणाचाही विलंब न करता गजेंद्र सोनटक्के यांनी संतोषसह घटनास्थळी धाव घेतली. मात्र, त्याआधीच महिलेने उपवन तलावात उडी मारली होती. ती बुडत असल्याचे पाहून गजेंद्र यांनी धावत येत थेट तलावात उडी मारली आणि महिलेला वाचवले.
हा सर्व प्रकार घटनास्थळी असलेल्या ठाणेकरांनी कॅमेऱ्यात कैद केला आहे. गजेंद्र सोनटक्के हे महिलेचा प्राण वाचवून बाहेर येताच उपस्थितीत ठाणेकरांनी गजेंद्र सोनटक्के यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला.
तलावातून बाहेर काढल्यानंतर महिलेला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती स्थिर असून तिला कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पण, तिने आत्महत्येचा प्रयत्न का केला? याची माहिती समजू शकली नाही.
हेही वाचा - आरक्षण द्या.. नाहीतर रस्त्यावर उतरू; ठाण्यात मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरू