ठाणे - जिल्ह्यातील भोईवाडा परिसरातून कत्तल करण्यासाठी नेत असलेल्या गाईंची सुटका करण्यात आली. तसेच एका आरोपीला अटक करण्यात आली, तर एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून दोन आरोपी फरार झाले आहेत.
ब्रिजेश कुमार लालजी यादव (वय 18) असे आरोपीचे नाव आहे, तर सलमान आणि सदरू असे फरार आरोपींचे नावे आहेत. तीन आरोपींनी ब्रिजेशकडून गोवंश खरेदी केले होते. त्यानंतर त्या गायी कत्तलखान्यामध्ये नेत असताना भोईवाडा पोलीस ठाण्याचे बीट मार्शल पोलीस हवालदार रवींद्र काळे यांना त्यांचा संशय आला. त्यामुळे त्यांनी समरूबागकडे जाणाऱ्या या आरोपींची चौकशी केली. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता ब्रिजेश यांच्याकडून गायी खरेदी करून त्या कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची कबुली त्यांनी दिली.
दरम्यान, याप्रकरणी ब्रिजेश याला मंगळवारी न्यायालयात हजर केले होते. त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर फरार आरोपींचा शोध भोईवाडा पोलीस घेत आहेत. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जे. पी. जाधव करीत आहेत.