नवी मुंबई - नवी मुंबईतील घणसोली परिसरात चक्क केमिकल्सच्या साहाय्याने बनावट ताडी निर्माण करणाऱ्या महाभागांना रबाळे पोलिसांनी गजाआड केले आहे. यल्लमा देवी चाळ, वडाच्या झाडाखाली यल्लंमा देवी मंदिराच्या बाजूला, गोल्डन नगर, नोसिल नाका घणसोली नवी मुंबई येथे रबाळे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमित शेलार यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे दोन व्यक्ती बनावट ताडी बनवत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार संबंधित ठिकाणी छापा घातला असता दोन व्यक्ती केमिकलचा वापर करून बनावट ताडी बनवत असल्याचे निदर्शनास आले. तसेच, 200 लिटर बनावट ताडी, ताडी तयार करण्याचे साहित्य असा एकूण 16,800/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या दोन्ही व्यक्तींवर रबाळे पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 ख, 65 ई-नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश गावडे, पो. नि. गुन्हे गिरीधर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित शेलार पोलीस नाईक किरण राऊत पोलीस नाईक विनोद वारिंगे, पोलीस नाईक दर्शन कटके, पोलीस शिपाई गणेश वीर यांच्या माध्यमातून करण्यात आली असून, बनावट ताडी बनविणाऱ्या दोघांना गजाआड करण्यात आले आहे.