ठाणे - भिवंडीतील लाहोटी कंपाऊंड येथे कापड मार्केटमधील 'बंटी शॉप'मध्ये एका ग्राहकाचा मोबाईल चोरणाऱ्या सराईत चोरट्याला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या २ तासांमध्ये पोलिसांनी शोधून काढले. कृष्णा सुरेश पवार (२२, रा. चव्हाण कॉलनी, भिवंडी) असे या चोरट्याचे नाव आहे.
भिवंडीतील लाहोटी कंपाऊंड येथे कापड मार्केटमधील बंटी शॉपमध्ये शनिवारी सायंकाळच्या सुमारास, निशांत गणेश पाटील हा युवक त्याच्या मित्रांसोबत कपडे घेण्यासाठी आला होता. कपडे घेतल्यानंतर त्याने दुकानातील टेलरकडे ते शिवण्यासाठी दिले. त्यावेळी टेलर अंगाचे माप घेत असताना त्याने हातातील १५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल कापडांच्या गठ्ठ्यावर ठेवला. ही बाब लक्षात येताच, संधी साधून चोरट्याने मोठ्या शिताफीने निशांतची नजर चुकवून मोबाईल घेऊन दुकानातून पोबारा केला.
हेही वाचा - 'छत्रपतींशी तुलना करु पाहणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही'
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे तसेच ए.पी.आय. जमीर शेख, पोलीस हवालदार सुरेश चौघुले यांच्या पथकाने तत्काळ तपास सुरू केला. यानंतर सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याला पकडण्यात आले. यानंतर चौकशीदरम्यान त्याने मोबाईल चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून दोन मोबाईल जप्त केले आहेत. तसेच रविवारी न्यायालयात हजर केल्यांनंतर त्याची रवानगी अधारवाडी कारागृहात करण्यात आली आहे.
ही मोबाईल चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याने चोरट्याची मोबाईल चोरी उघड झाली आहे. या घटनेबद्द्ल भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पुढीत तपास सुरू आहे.