ठाणे- हाजी मलंग यात्रेत भाविकांच्या मोबाईलवर डल्ला मारणाऱ्या सराईत सख्ख्या दोन भावांना हिललाईन पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्यांकडून तब्बल १३ महागडे मोबाईल आणि ७ हजार रुपये किंमतीचा गांजाही हस्तगत करण्यात आला आहे. अमीर सलीम सैय्यद (वय १९, रा. मुंब्रा), तौसिक सलीम सैय्यद (वय २९, रा. मुंब्रा) अशी त्या चोरट्यांची नावे आहेत.
हेही वाचा- अभिनेते सयाजी शिंदेंच्या उपस्थितीत बीडमध्ये हजारोंच्या संख्येने निघाली वृक्षदिंडी
अंबरनाथ तालुक्यातील हाजीमलंग वाडी बसस्थानकावर दुपारी साडे १२ च्या सुमारास दोन तरुण हातात पिशवी घेवून उभे होते. दरम्यान, हिललाईन पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई उमेश कोळंबे, अशोक थोरवे, पोलीस नाईक विक्रम जाधव यांना त्यांच्यावर संशय आला. त्यांनी त्या दोघांची अंगझडती घेतली. यात अमीर सलीम सैय्यद याच्याजवळ विविध कंपनीचे १३ महागडे मोबाईल आढळले. तर तौसिक सलीम सैय्यद याच्या जवळ ३०० ग्रॅम वजनाचा गांजा आढळला. याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, अंबरनाथ तालुक्यातील हाजी मलंग हे हिंदू-मुस्लीम एकतेचे धार्मिकस्थळ असून येथे दरवर्षी यात्रा भरते. या यात्रेत देश-विदेशातून लाखो भाविक येतात. यंदा देखील एक आठवड्याची यात्रा येथे सुरू आहे. या यात्रेतील गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी मोबाईल चोरले आहेत का? दुसरीकडून चोरीचे मोबाईल घेवून विक्रीसाठी यात्रेत आणले होते? याचा तपास सहायक पोलीस निरिक्षक विनोद पाटील करीत आहेत.