ठाणे - संचारबंदी असताना कोणीही अत्यावश्यक बाब वगळता घराबाहेर पडणे अपेक्षित नसते. त्यामुळे राज्यात काल सोमवारपासून संचारबंदी लागू केल्यानंतर नागरिकांनी घरात रहावे, असे आवाहन सगळ्या माध्यमातून केले जात आहे. तरिही नागरिक रस्त्यावर येत बाजारांमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. अशा वेळी नागरिकांना शिस्त लावण्यासाठी नाईलाजास्तव पोलिसांना काठीचा वापर करावा लागत आहे.
हेही वाचा... वसईत आढळला कोरोनाचा एक रुग्ण, राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 97 वर
नागरिकांना आम्ही विनंती करत आहोत की, त्यांनी घरात रहावे. जेणेकरून कोरोनाची साखळी तुटेल व संक्रमणाचा धोका कमी होईल. परंतु नागरिक याला न जुमानता रस्त्यावर उतरत आहेत. त्यामुळे धोका दिवसागणिक वाढत आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त नीता पडवी यांनी दिली. नागरिकांच्या आणि पोलिसांच्या सहकार्यानेच हे संकट दूर होण्यास मदत होईल, त्यामुळे सर्वांनी घरीच रहावे व प्रशासनाच्या सर्व निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन नीता पडवी यांनी केले आहे.