ठाणे- उल्हासनगरजवळील माणेरा गावात गावठी दारूच्या भट्टीवर मध्यवर्ती पोलिसांनी धाड टाकली. यात 18 ड्रम गावठी दारू जागीच नष्ट केली आहे, तर दारू माफिया अनंता भोईर याला ताब्यात घेतले आहे. या धडक कारवाईमुळे हातभट्टीची दारू बनविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
हेही वाचा- जगभरात कोरोनामुळे ४ हजार जणांचा मृत्यू; चीनबाहेर २८ हजार नागरिकांना लागण
उल्हासनगरजवळील माणेरा गावात गावठी हातभट्टी दारू मोठ्या प्रमाणात तयार केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांच्या आदेशानुसार मध्यवर्ती पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास माणेरा गावात सापळा रचला. त्यावेळी विठ्ठल मंदिराच्या मागे मोठ्या प्रमाणात गावठी दारू तयार होत असल्याचे निदर्शनास आले. तत्काळ या हातभट्टीवर धाड टाकून दारू माफिया आनंता भोईर याला ताब्यात घेण्यात आले, तर यातील दोन आरोपी कृष्णा भोईर व यादव हे फरार झाले आहेत.
घटनास्थळावरून गूळ मिश्रीत करण्यासाठी लागणाऱ्या तीन टाक्या, गावठी दारूची साठवणूक करण्यासाठी लागणारे 18 ड्रम जागीच नष्ट करण्यात आले. एक पाण्याची मोटार, 11 खोकी नवसागर, दोन दारूचे डिग्री मोजण्याचे मापक, एक कोळसा जाळण्याची मोटार असे एकंदरीत 1 लाख 40 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी आरोपी अनंता भोईर आणि त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहे.