ठाणे : जिल्ह्यात गुन्हेगारांचे वाढते गुन्हे पाहता, जिल्ह्यातील पाचही पोलीस उपआयुक्त कार्यालयाच्या हद्दीत असलेल्या विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून, रात्रीच्या गस्त वाढण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर भिवंडी झोनचे पोलीस उपआयुक्त नवनाथ ढवळे यांनीही कोनगावसह त्यांच्या हद्दीत असलेल्या सर्वच पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना रात्र गस्त घालण्याचे आदेश दिले होते.
पोलीस पथकांसह रात्री गस्तीवर होते : आदेशानुसार कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील हे त्यांच्या पोलीस पथकांसह रात्री गस्तीवर होते. त्यातच एक संशयित गुन्हेगार १३ जून रोजी रात्रीच्या सुमारास कल्याण - भिवंडी महामार्गावरील गोवे गावच्या हद्दीत असलेल्या, जय मल्हार हॉटेल परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील यांना मिळाली होती.
देशी बनावटीचे पिस्तूल सापडले : या माहितीच्या आधारे त्यांनी पोलीस पथकासह मंगळवारी रात्रीच्या सुमारास सदर ठिकाणी सापळा रचला होता. त्यावेळी एक संशयित गुन्हेगार ढाब्याच्या मागे पोलिस पथकाला मिळून येताच त्याच्यावर झडप घालून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याजवळ ६५ हजार ६५० रुपयांचे एक देशी बनावटीचे पिस्तूल तसेच २ जिवंत काडतुसे आढळून आले. पोलिसांनी पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसे जप्त केले. तसेच शहजाद खानवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.
कुख्यात गँगशी संबंध आहे का ? : अटक गुन्हेगार हा मूळचा उत्तरप्रदेश येथील बरायल गावात राहणारा आहे. तो सद्या नवी मुंबईतील वाशी परिसरात असलेल्या एपीएमसी भाजी मार्केटमध्ये राहतो. दरम्यान, गुन्हेगार शहजाद याचा कोणत्या कुख्यात गँगशी संबंध आहे का ? त्याने देशी बनावटीचे पिस्तूल व काडतुसे कोणाचा घातपात करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगली होती का ? या दिशेने कोनगाव पोलीस तपास करीत आहेत. दुसरीकडे अटक गुन्हेगाराला बुधवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा -