ठाणे : क्षुल्लक वादातून पत्नीच्या डोक्यात लोखंडी पाईपने प्रहार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी ठाण्यात घडली. भिवंडी तालुक्यातील पूर्णा गावात असणाऱ्या एका चाळीत ही घटना घडली. विशेष म्हणजे, हत्या केल्यानंतर फरार झालेल्या आरोपीने पुण्यातील आपल्या एका नातेवाईकाला स्वतःच आपल्या कृष्णकृत्याची माहिती दिली. त्यानंतर या नातेवाईकाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी पतीचा शोध सुरू केला आहे.
अशोक विष्णू पांडव (३४) असे हत्या करुन फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर, कविता अशोक पांडव (२५) असे पत्नीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन, आरोपीने गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास पुन्हा पत्नीशी भांडण केले. त्यातच राग अनावर झाल्याने अशोकने पत्नीस लोखंडी पाईपने मारहाण करत तिची हत्या केली. यानंतर तो घरातून पळून गेला.
या घटनेची माहिती समजताच नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी तातडीने पोलीस पथक घटनास्थळी रवाना केले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला असून, या प्रकरणी पोलिसांनी फरार पती अशोक पांडव या विरोधात हत्या केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.