ठाणे - जगातील सर्वात वेगवान पक्षी असलेल्या दुर्मिळ जातीचा बहिरी ससाणा हा पक्षी उल्हासनगर शहरातील शहाड भागात असलेल्या संचुरी कंपनीमध्ये कबुतराची शिकार करायला आला होता. मात्र, कबुतरांची शिकार करताना तोच जाळ्यात अडकल्याची घटना घडली आहे. त्यांनतर पक्षी जाळ्यात अडकल्याचे पाहून सेंचुरी कंपनीतील अग्निशमन पथकाने या शिकारी पक्षाला रेस्क्यू करून कल्याणच्या वन विभागाच्या ताब्यात दिले. आता या शिकारी पक्षाला जंगलामध्ये सोडण्यात येणार आहे.
भक्ष्य म्हणून कबुतरांच्या शोधात शिकारी बहिरी ससाणा
कावळ्यापेक्षा आकाराने थोडा मोठा असलेला बहिरी ससाणा हा पक्षी हवेमध्ये उंचावर झेपावतो. हवेत दीर्घकाळ तरंगत जमिनीवरील तसेच पाण्यातील छोट्या पक्ष्यांवरच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवतो. आपले भक्ष्य निश्चित झाले की, उड्डाणपंख जवळ घेऊन, शरीर शंकूच्या आकाराचे बनवून भक्ष्याच्या दिशेने अत्यंत जलद गतीने झेप घेतो. विशेतः बहिरी ससाणा हा भारतामध्ये हिवाळी स्थलांतरकरून ऑक्टोबर ते एप्रिल महिन्यापर्यंत आपल्याकडे वास्तव्य करत असल्याची माहिती पक्षीप्रेमी व सर्पमित्र दत्ता बोबे यांनी दिली आहे. त्यातच पाणथळ जागा व त्याच्या आजूबाजूच्या सपाट मैदानी तसेच झुडुपी प्रदेशात त्यांना मुबलक अन्न मिळतो. शहरी भागाजवळही यांचे वास्तव्य समुद्रकिनारे, तलाव, खाडी व मिठागरांमध्ये आढळून येत असल्याचे सांगण्यात आले. उल्हासनगर शहरांमध्ये विशेतः कंपनीच्या मागे मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे, पाणथळ जमीन आणि लगतच नदी असल्याने या भागात वाढलेली कबुतरांची संख्या या शिकारी पक्षाला आकर्षित करीत आहेत.
बहिरी ससाणा शिकाऱ्याचे वैशिष्ठ
बहिरी ससाणा हा आपल्या शक्तिशाली व अणकुचिदार पंजाचा आघात भक्ष्यावर करून त्याला जखमी करतो व लगेच त्याला उचलून शांत ठिकाणी नेऊन त्याचा फाडशा पाडतो. ताशी अंदाजे 240 मैलाचा वेग असूनही या ससाण्याच्या शिकारीचे बहुतेक प्रयत्न असफल ठरतात. काही वेळा गरुडासारखे मोठे पक्षीसुद्धा यांची शिकार पळवतात.
हेही वाचा - जेवण चांगले बनवले नाही! नवऱ्याने गळा दाबून केला बायकोचा खून