नवी मुंबई - सिडकोची स्थापना 17 मार्च, 1970 ला झाली होती. सिडकोच्या स्थापनेनंतर सिडकोने नवी मुंबई, पनवेल उरणमधील अनेक भूमिपुत्रांची फसवणूक केली आहे, असा आरोप भूमिपुत्रांनी केला आहे. सिडकोने भूमीपुत्रांच्या जमिनी अल्प दराने खरेदी केल्या होत्या. त्याच जमिनी सिडको कोट्यवधी रुपयाने विकत आहे. सिडकोने भूमिपुत्रांवर प्रचंड अन्याय केला आहे. 17 मार्च हा सिडकोचा स्थापना दिवस असून, नवी मुंबई, पनवेल उरणमधील सर्व प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र काळा दिवस म्हणून साजरा करणार आहेत. तसेच सिडकोचे मंडळ बरखास्त करा, अशीही मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे.
एकरी 100 कोटीने सिडको विकतेय जमिन
एकरी 3 हजार पासून 15 हजार रुपयांने भूमिपुत्रांकडून घेतलेल्या जमिनी सिडको एकरी 100 कोटी दराने विकत आहे.
सिडको बरखास्त करण्याची मागणी
सिडकोने जमिनी संपादित करून कित्येक वर्षे लोटली तरी भूमिपुत्रांचे प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. यामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्या, गावठाण विस्तार, प्रकल्पग्रस्तांची घरे, साडे बारा व साडे बावीस टक्के भूखंड, हे अनेक प्रश्न प्रलंबित असून, सिडको मंडळ बरखास्त करा, अशी मागणी भूमिपुत्रांनी केली आहे.
सिडकोचा स्थापना दिवस प्रकल्पग्रस्त करणार काळा दिवस म्हणून साजरा
17 मार्चला सिडकोची स्थापना होऊन 51 वर्षे पूर्ण होतील. सिडकोमुळे प्रकल्पग्रस्तावर अन्याय झाल्याने नवी मुंबई, उरण पनवेलमधील प्रकल्पग्रस्त सिडकोचा निषेध करत काळा दिवस म्हणून साजरा करणार आहेत. तसेच प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांची पूर्ती करावी अन्यथा भूमीपुत्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भूमिपुत्रांनी दिला. येत्या 17 मार्चला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रकल्पग्रस्त व गावचे प्रमुख फलक हाती घेऊन सिडकोचा निषेध करतील, असे अॅड सुरेश ठाकूर यांनी सांगितले.
हेही वाचा - महावितरणच्या वाशी मंडळात वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई