ठाणे - गेल्या काही दिवसांपासून शहरातील कोरोना बाधितांची संख्या कमी होत आहे. ऐन दिवाळीत ही संख्या दोन आकड्यांवर आल्यामुळे ही दिलासादायक बाब आहे. बाधित होण्याचे प्रमाणही आता ८.३९ वर आले आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर हा ९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोना आटोक्यात आला असला तरीही नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरामध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा सरासरी १५० इतका आहे. ऐन दिवाळीच्या काळात गेल्या दोन दिवसांपासून ही संख्या दोन आकड्यात येत आहे. १५ नोव्हेंबरला ७७ नविन बाधितांची नोंद करण्यात आली होती. तर १६ नोव्हेंबरला ९५ बाधितांची नोंद करण्यात आली.
सरासरी 6 हजार चाचणी -
कोरोनाची साथ नियंत्रणात आलेली असतानाही महापालिका सरासरी ५५०० ते ६००० पर्यंत चाचण्या करीत आहे. १६ नोव्हेंबरपर्यंत साधारणत: ५ लक्ष ७७ हजार २५७ इतक्या चाचण्या महानगरपालिकेने केल्या आहेत. त्यामुळे योग्यवेळी बाधित व्यक्तींवर उपचार करणे सोयीचे झाले आहे.
सद्यस्थितीत ठाणे शहराचा मृत्यूदरही कमी होत आहे. तो आता २.३१ इतका झाला आहे. तर कोरोना मुक्त रूग्णांचे प्रमाण हे जवळपास ९५ टक्क्यांवर पोहोचले आहे. महापालिकेच्यावतीने कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी कठोर उपाययजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी ही साथ नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी केले आहे.
हेही वाचा - ठाण्यात रक्तदानाने साजरी दिवाळी पहाट; कोरोना काळात शेकडो तरुणांचा स्तुत्य उपक्रम
आवश्यकता नसताना बाहेर पडू नका -
नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये. कामासाठी बाहेर पडायचे झाल्यास विनामास्क बाहेर पडू नये, योग्य अंतर ठेवावे आणि सॅनिटायझरचा वारंवार वापर करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी केले आहे.