ठाणे - डोंबिवली एमआयडीसी फेज २ मधील आशापुरा मंदिर परिसरातील नाल्याला लागून असलेल्या एका उघड्या चेंबरमधून मोठ्या प्रमाणात विषारी धूर निघत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार सुरू असून नाल्यातही प्रदूषित रंगीत सांडपाणी वाहत असल्याचे नागरिकांनी सांगितले. तर, या गंभीर बाबीकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
एमआयडीसी परिसरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या ७० टक्के पाईपलाईन फुटलेल्या असून त्यातून रसायनमिश्रित पाणी बाहेर वाहत आहे. या प्रश्नावर मागील २ वर्षांपासून पाठपुरावा करूनही एमआयडीसी नाल्यांच्या दुरूस्तीचे काम करू शकली नाही. वायू प्रदूषणाचा त्रास कमी होण्यासाठी गॅस पंपिंग स्टेशन उभारण्याची मागणी यापूर्वीच करण्यात आली आहे. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कारभार पारदर्शक नसल्याचा आरोपही यापूर्वी वारंवार करण्यात आला आहे. असे असूनही कारखानदारांकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना हप्ते मिळत असल्यानेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - राज्य शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल
मध्यंतरी प्रदूषणाचा त्रास होत नव्हता. मात्र गेल्या ३ महिन्यांपासून अचानक प्रदूषण कसे वाढले, कोणत्या कंपन्यांतून कोणता वायू बाहेर जातो. कोणती कंपनी प्रदूषणास जबाबदार आहे याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना माहीती असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. तसेच, रहिवाश्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या कंपन्या बंद करण्याची मागणीही यानिमित्ताने पुढे येत आहे.
एमआयडीसीमध्ये एकूण ३१० कारखाने आहेत. सांडपाणी वाहून नेणारा भोपर व खांबाळपाडा नाल्याची जबाबदारी एमआयडीसीची असल्याने या प्रदूषणाला एमआयडीसीच जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. तर दुसरीकडे, एमआयडीसी व प्रदूषण नियंत्रण मंडळ एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. प्रदूषणाची जबाबदारी ही प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीतील उत्पादनाचे नमुने घेऊन त्याचा अहवाल एमआयडीसीला देणे क्रमप्राप्त आहे. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठपुरावा करूनही तपासणी अहवाल अद्याप मिळालेला नाही. तसेच, मंडळ सहकार्य करत नसल्याचे एमआयडीसीचे अधिकारी सांगतात. तसेच सांडपाण्याच्या नाल्यांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी एमआयडीसीची असूनही ही कामे केली जात नसल्याचा आरोप स्थानिक उद्योजकांनी एमआयडीसीवर केला आहे.
हेही वाचा - किरकोळ बाजारात कांद्यासह पालेभाज्या कडाडल्या, गृहिणींचे बजेट कोलमडले