ठाणे - मध्य रेल्वे मार्गावर कल्याण डोंबिवलीदरम्यान मेगाब्लॉक आहे. विशेष लोकल अर्धा ते पाऊण तास उशिराने असल्यामुळे दिवा आणि डोंबिवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली आहे. त्यातच मुंबईकडे जाणारी एकही गाडी नाही. त्यामुळे प्रवासी चांगलेच संतापले असून त्यांनी रेल्वे रुळावरच काही काळ ठिय्या मांडला. यावेळी पोलिसांनी सर्वांना सूचना करीत बाहेर काढले.
ठाकुर्ली स्थानकात पादचारी पूलाचे गर्डर उभारण्यासाठी कल्याण-डोंबिवली दरम्यान धीम्या-जलद मार्गांसह पाचव्या-सहाव्या मार्गावर बुधवारी २५ डिसेंबरला विशेष ब्लॉक घेण्यात आला. मात्र, ऐन नाताळ सणाला हा विशेष ब्लॉक घेतल्याने सकाळच्या सुमारास कामावर जाणाऱ्या डोंबिवलीतील चाकरमानी लोकलची वाट व गर्दी पाहून संतापले होते. तसेच त्यांनी एकच गोंधळ घातला होता.
ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ पादचारी पुलाचे सकाळी ९.४५ ते दुपारी १.४५ या काळात करण्यात येत आहे. या पुलावर ४०० मेट्रिक टन वजनी ६ मीटर रुंदीचे ४ गर्डर उभारण्याचे काम सुरू आहे. यामुळे कल्याण-डोंबिवली दरम्यानची वाहतूक ५ तास पूर्णपणे बंद राहणार असून एकूण १६ मेल एक्स्प्रेस रद्द राहणार आहे. यामुळे कल्याण, डोंबिवली स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. त्यातच एक प्रवासी डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात झालेल्या गर्दीचा फायदा घेत भडकावणारे भाष्य करून काही प्रवाशांची माथी भडकवत होता. त्यामुळे डोंबिवलीतील प्रवाशांनी त्याला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांनतर रेल्वे पोलिसांनी माथी भडकवणाऱ्या त्या माथेफिरूला अटक केली आहे. विशेष म्हणजे हा प्रवासी विनातिकीट प्रवास करून प्रवाशांना भडकवण्याचे काम करत होता.
दरम्यान, डोंबिवलीकरांनी आजच्या विशेष ब्लॉकमुळे वेळेवर कामाच्या ठिकाणी जाण्यास मिळाले नाही. त्यामुळे नक्की कशाला प्राधान्य द्यायचे, की विकासाची वाट बघत एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे लटकत, लोंबकळत मरायचे?, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.
ठाणे-डोंबिवली दरम्यान २० मिनिटांनी विशेष लोकल -
कल्याण ते डोंबिवली दरम्यानची रेल्वे वाहतूक सकाळी १० ते दुपारी २ च्या दरम्यान बंद राहणार आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने कल्याण ते कर्जत-कसारा, सीएसएमटी ते डोंबिवली, ठाणे-डोंबिवली दरम्यान २० मिनिटाच्या अंतराने विशेष लोकल सेवा सुरू ठेवली आहे.