ठाणे - पालघर मॉब लिंचिंग प्रकरणाची चौकशी करणार्या सीआयडी पोलिसांनी भिवंडी येथील न्यायालयात दोन अल्पवयीन आरोपींविरूद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. शुक्रवारी बाल न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले, अशी माहिती एका अधिकाऱ्याने शनिवारी दिली.
गेल्या महिन्यात सीआयडीने पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील न्यायालयात दोन आरोपपत्रे दाखल केली होती, त्यापैकी एक 4955 पानांचे आणि दुसरे 5921 पानांचे होते. या घटनेसंदर्भात एकूण 154 लोकांना अटक करण्यात आली असून त्यात 11 अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
राज्य सीआयडीच्या एका उच्च अधिकाऱ्याने सांगितले की, दोन अल्पवयीन आरोपींविरोधात शुक्रवारी भिवंडी किशोर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. परंतु, अन्य चार आरोपींचे नाव त्या आरोपपत्रात घेण्यात आलेले नाही.
काय आहे प्रकरण -
16 एप्रिल रोजी पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर, दरोडेखोर असल्याच्या संशयातून जमावाने हल्ला करत दोन साधू व वाहनचालक अशा तिघांची हत्या केली होती. तिहेरी हत्या प्रकरणात 165 आरोपींना अटक करण्यात आली असून यातील 11 जण अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी भिवंडी येथील बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. तिहेरी हत्याप्रकरण देशभर चर्चेचा मुद्दा बनला. हे संपूर्ण प्रकरण हाताळत असताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. याप्रकरणात आतापर्यंत कासा पोलीस ठाण्यातील 2 पोलीस अधिकारी व 3 कर्मचाऱ्यांचे निलंबन तसेच 35 कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात अन्य ठिकाणी बदली करण्यात आली आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 7 मे रोजी गडचिंचले येथे घटनास्थळाचा दौरा केल्यानंतर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. पालघरचे पोलीस अधीक्षक म्हणून दत्तात्रय शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. गडचिंचले तिहेरी हत्याकांडाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागामार्फत सुरू आहे.